सराफ दुकानातून ८९ लाखांचे दागिने चोरणाऱ्या दोघांना पकडले
Dhule News धुळे : येथील सराफा बाजारातील स्वर्ण पॅलेस ज्वेलर्स हे सोने-चांदीचे दुकान फोडून सुमारे ८९ लाखांचे दागिने चोरणाऱ्या टोळीतील दोन संशयितांना पकडण्यात आझादनगर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी त्यांना शनिवारी अटक केली. या गुन्ह्यातील अन्य एक संशयित फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या चोरीतील मुख्य सूत्रधार जालन्याचा आहे आणि तो सराईत गुन्हेगार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली.
चोरीच्या आधी केली होती रेकी : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ०९ जुलै रोजी रात्री ८.३० ते १० जुलै रोजी पहाटे ४ वाजेचे दरम्यान आझादनगर पोलीस स्टेशन हद्दीत आग्रा रोडवरील स्वर्ण पॅलेस हे सराफ दुकान ३ अज्ञात चोरट्यांनी फोडले आणि सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. चोरी करण्याच्या तीन दिवस आधी एका चोरट्याने दुकानाची रेकी केली होती. याप्रकरणी प्रकाश जोरावरमल चौधरी (रा. नित्यानंदनगर, नटराज टॉकीज जवळ धुळे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक १० जुलै रोजी आझादनगर पोलीस स्टेशन येथे भादवि कलम ४५७, ३८०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सीसीटीव्ही फुटेज ठरले महत्वपूर्ण : गुन्हा घडल्यानंतर आझादनगर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सराफ दुकानातील प्राप्त सीसीटीव्ही फुटेज तसेच बाजारपेठेतील दुकानातून सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून त्याचे विश्लेषण केले. गुन्ह्याच्या तपासात असताना पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना नमूद गुन्हा हा किशोर टाक (रा. जालना) याने त्याच्या इतर साथीदारांसह केला असल्याबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार आझादनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना रवाना करून नमूद आरोपिंना ताब्यात घेण्याचे आदेश दिले. पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी जालना येथे जाऊन आरोपी किशोरसिंग रामसिंग टाक (वय २५ वर्ष, रा. गुरुगोविंदनगर, शिवाजीनगर जवळ, जालना) याला ताब्यात घेतले. गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता, त्याने हा गुन्हा इतर दोन साथीदारांच्या मदतीने केला असल्याचे सांगितले. पथकाने किशोरसिंग टाक याचा दुसरा साथीदार झेनसिंग उर्फ लकी जीवनसिंग जुनी, (वय २८ वर्ष, रा. नवनाथ मंदिराजवळ हरी विठ्ठलनगर, जळगाव) या ठिकाणावरून ताब्यात घेतले.
पावणेदोन लाखांचा ऐवज हस्तगत : दोन्ही आरोपींकडून ६०,००० रूपये रकमेची १ किलो २० ग्रॅम वजनाची पाच नग चांदीची पट्टी, ७२ हजार रूपये रकमेची १४.४३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे ३ लगड, ४० हजार रूपये रकमेची काळया रंगाची हिरो फॅशन मोटारसायकल असा एकूण १ लाख ७२ हजाऊ रूपये रकमेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
आतापर्यंत ३१ गुन्हे दाखल : आरोपी किशोरसिंग रामसिंग टाक हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये एकूण ३१ घरफोडी आणि जबरी चोरीसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
यांच्या पथकाने केली कारवाई : ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे शहर विभाग ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद नवगिरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश माळी, पोहेकॉ. योगेश शिरसाठ, पोलीस नाईक योगेश शिंदे, संदीप कढरे, अविनाश लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल अझहर शेख, सचिन जगताप, निलेश पाकड, पंकज जोंधळे, सिद्धार्थ मोरे, महिला पोलीस शिपाई पवार, पारेराव यांच्या पथकाने केली.