भाजीपाला विक्रेत्याच्या घरात 42 हजारांची चोरी
Dhule News धुळे : तालुक्यात सोनगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नंदाणे गावात विठोबा उत्तम पाटील (28) यांच्या घरात भरदिवसा 42 हजारांची चोरी झाली आहे.
नंदाणे गावात 27 जुलै रोजी सकाळी 10 ते दुपारी 1.30 वाजेच्या दरम्यान ही चोरी झाली. कुटुंबातील सर्वजण कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यामुळे घराला कुलूप होते. घरात कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी कुलूप उघडून घरात प्रवेश केला. लोखंडी कपाट फोडून त्यातील ऐवज चोरला.
हा ऐवज केला लंपास
15 हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे टोंगल, 12 हजार रुपये किमतीची साडेतीन ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, सहा हजार रुपये किमतीचे एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, एक हजार रुपये किमतीचे पाच भार चांदीच्या साखळ्या, एक हजार रुपये किमतीचे तीन भार चांदीचे ब्रेसलेट आणि सात हजार रुपये रोख असा एकूण 42 हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.
याप्रकरणी विठोबा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनगीर पोलीस ठाण्यात 28 जुलै रोजी सायंकाळी भादवि कलम 380, 457 अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल रवींद्र दराडे करीत आहेत.