धुळे पोलिसांच्या श्वान पथकातील प्रिन्सचा मृत्यू
Dhule News धुळे : जिल्हा पोलीस दलाच्या श्वान पथकातील प्रिन्सचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. तो एक वर्ष आठ महिन्यांचा होता. आजारपणामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली. पोलीस दलाने एक मोठा अधिकारी गमावला आहे, अशा शब्दात त्यांनी यांनी श्रद्धांजली वाहिली.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार : धुळे पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मंगळवारी दुपारी प्रिन्सवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी देण्यात आली. पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, श्वान पथकाचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस उपनिरीक्षक राजु जाधव, श्वान हस्तक हेड कॉन्स्टेबल कैलास चौधरी, काॅन्स्टेबल चंद्रशेखर माळी यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी श्रध्दांजली वाहिली. पोलीस मुख्यालय मैदानावर दफनविधी करण्यात आला.
पोलिसांच्या डोळ्यात पाणी : प्रिन्सविषयी माहिती देताना श्वान हस्तक परदेशी आणि माळी यांचा कंठ दाटून आला होता. श्वान प्रिन्स हा डाॅबरमन जातीचा होता. पुणे सीआयडी येथील श्वान प्रशिक्षण केंद्रात त्याचे प्रशिक्षण झाले होते. २१ फेब्रुवारी २०२३ रोजी तो धुळ्याच्या श्वान पथकात दाखल झाला होता. गुन्ह्यांच्या तपासात प्रिन्स चांगले सहकार्य करायचा. आरोपींचा शोध घेण्यासाठी बरोबर माग काढायचा असे पोलिसांनी सांगितले.
श्वान पथकात वीर दाखल : धुळे जिल्हा पोलीस दलाच्या श्वान पथकात लॅबरेडोर जातीचा वीर श्वान दाखल झाला आहे. रात्री २.३० वाजता तो धुळ्यात दाखल झाला आणि सकाळी प्रिन्सने प्राण सोडले. त्यामुळे धुळे पोलिसांसाठी ही घटना भावनिक आहे.
श्वानांना मिळतो पगार : पोलिसांत कार्यरत श्वान पथकातील श्वान १० वर्षे सेवा देतात. त्यानंतर शासन नियमानुसार त्यांना निवृत्त केले जाते. त्यांचा पगार हा केवळ श्वानांच्या आहारावर खर्च होतो. सेवानिवृत्तीनंतर अनेक प्राणी संघटना, इच्छुक शासकीय कर्मचारी व नागरिक या श्वानांचा सांभाळ करण्याची तयारी दर्शवतात. पण प्रोफाइल तपासल्याशिवाय त्यांना श्वानाचा ताबा दिला जात नाही. निवृत्तीनंतरही श्वान पथक या श्वानांची काळजी घेत असतात. रोज २५० ग्रॅम राॅयल कॅनल : सकाळी व सायंकाळी प्रत्येकी २५० ग्रॅम टॅब्लेट स्वरूपातील रॉयल कॅनल दिले जाते. मांस व सकस आहारचा त्यात समावेश असतो. याशिवाय दरमहा त्यांचे वजन तपासले जाते. तसेच नियमित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी होते.