आमदार किशोर पाटीलवर गुन्हा दाखल करा धुळे जिल्ह्यातील पत्रकारांची मागणी
Dhule News धुळे : पत्रकार संदीप महाजन यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी पाचोरा तालुक्याचे आ. किशोर पाटील यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांना निवेदन देवून करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, पत्रकार हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा वारसदार मानला जातो. लोकशाही व्यवस्था सुदृढ ठेवण्यात प्रसारमाध्यमांची भूमिका महत्वाची ठरत असते. पत्रकार समाजाचा आरसा असतो. जागरुक पहारेकरी असतो. चुकीच्या व समाजव्यवस्थेला घातक ठरणार्या बाबी प्रसारमाध्यमे उघडकीस आणतात. एक प्रकारे पत्रकार हा समाजव्यवस्थेत जागल्याचे काम करीत असतो. म्हणून प्रसारमाध्यमांना लोकशाहीचा चौथा आधारस्तभ म्हटले जाते. या चौथ्या स्तंभाचा वारसदार असलेले पत्रकार संदीप महाजन यांना पाचोरा तालुक्याचे आमदार किशोर पाटील यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. लोकप्रतिनिधीने पत्रकाराशी असे वागणे हे लोकशाहीचा व माध्यमांचा अपमान करणारे आहे. धुळे जिल्हा मराठी पत्रकार सघातर्फे याप्रकरणी आ. किशोर पाटील यांचा तीव्र निषेध करीत आ. किशोर पाटील यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनावर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रविंद्र इंगळे, चंद्रशेखर पाटील, मिलींद बैसाणे, विद्यमान अध्यक्ष विशाल ठाकूर, उपाध्यक्ष मनोज गर्दे, सचिव सचिन बागुल, कोषाध्यक्ष अतुल पाटील, सुनील बैसाणे, प्रांतिक प्रतिनिधी तुषार बाफना, कार्यकारिणी सदस्य प्रा. मोहन मोरे, प्रकाश शिरसाठ, पवन मराठे, डॉ. श्रीकृष्ण बेडसे, जॉनी पवार, देवेंद्र पाटील, आकाश सोनवणे, सिध्दार्थ मोरे, अजिंक्य देवरे, पुरुषोत्तम गरुड, जमील शाह, सुनील चौधरी, दिपक शिंदे, किशोर पाटील, नागिंद मोरे, मनोहर सोलंकी, गणेश पवार, सुनील निकम इत्यादी पत्रकारांच्या सह्या आहेत.