पाचोर्यात पत्रकाराला बेदम मारहाण, आमदार देणार मुख्यमंत्र्यांना निवेदन
Dhule News धुळे : महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे आमदार किशोर पाटील यांनी एका पत्रकाराला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याची घटना ताजी असताना, गुरुवारी त्या पत्रकाराला भर रस्त्यात अडवून बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. धुळे शहराचे आमदार फारुख शहा यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. हल्लेखोरांवर त्वरित कारवाई करण्याच्या मागणीसाठी आपण मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी स्थानिक पत्रकाराला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या प्रकाराने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. ज्या पत्रकाराला आमदारांनी शिवीगाळ केली होती, त्याच पत्रकाराला मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आमदार किशोर पाटील समर्थकांनी मला मारहाण केल्याचा आरोप स्थानिक पत्रकार संदीप महाजन यांनी केला आहे.
अश्लील शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याच्या प्रकारानंतर स्थानिक पत्रकार महाजन यांनी माझ्या जीवाला धोका असल्याचे सांगत पोलीस संरक्षणाची मागणी केली होती. तसेच मला काहीही झाल्यास त्याला जबाबदार आमदार किशोर पाटील व त्यांचे सहकारी असतील असं सुद्धा म्हटलं होतं.दरम्यान गुरूवारी सकाळी याच स्थानिक पत्रकाराला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. आमदार किशोर पाटील यांच्या समर्थकांनीच मला मारहाण केली, असा आरोप संबंधित मारहाण झालेल्या स्थानिक पत्रकार संदीप महाजन यांनी केला आहे. यापुढेही माझ्या आणि कुटुंबियांच्या जीविताला धोका असून पोलिसांनी आता तरी संरक्षण द्यावं, असं पत्रकार महाजन म्हणाले.
दरम्यान, मारहाणीनंतर पत्रकार संदीप महाजन यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “आधी मला शिव्या दिल्या गेल्या. आता मला मारहाण झाली आहे. याआधाही माझ्या जीवाला आमदारांपासून आणि त्यांच्या कार्यकर्त्यांपासून धोका असल्याचं मी म्हणाले होतो. मात्र माझ्या मागणीनंतरही पोलिसांनी मला संरक्षण दिलं नाही. आताही मला आणि माझ्या कुटुंबाला असुरक्षित वाटतंय. मला व माझ्या कुटुंबाला काही झालं तर त्याला जबाबदार आमदार किशोर पाटील आणि पोलीस प्रशासन राहील”
नेमकं प्रकरण काय?
जळगाव जिल्हा सध्या एका अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणावरुन हादरला आहे. या प्रकरणावरुन स्थानिक पत्रकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाष्य करणारी बातमी केली. ही बातमी किशोर पाटील यांना चांगलीच झोंबली. किशोर पाटील यांनी पत्रकार महाजन यांना फोन करून अश्लील शिवीगाळ केली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांच्या समर्थकांकडून आज पत्रकार महाजन यांना मारहाणही केली आहे.
शिवसेना आमदाराला बहिणीने सुनावले खडे बोल
दरम्यान, या प्रकरणावरून किशोर पाटील यांची बहीण आणि ठाकरे गटातील नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.
किशोर पाटील हे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार आहेत. सेनेतील फुटीनंतर पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. तर त्यांच्या भगिनी वैशाली सूर्यवंशी मात्र ठाकरेंच्या पाठीशी ठाम राहिल्या. राजकीय मैदानात एकमेकांच्या आमनेसामने असलेली ही भावंडं कौटुंबिक समारंभांना मात्र एकत्र दिसत. परंतु पाटील यांच्या समर्थकांनी पत्रकाराला मारहाण केल्याचा आरोप झाल्याने आता वैशाली सुर्यवंशी भडकल्या असून त्यांनी भावाचे कान उपटले आहेत.
काय म्हणाल्या वैशाली सुर्यवंशी?
याच प्रकरणावरून आता आमदार किशोर पाटील यांच्यावर संताप व्यक्त करत त्यांच्या चुलत बहीण वैशाली सूर्यवंशी यांनी खडे बोल सुनावले आहेत. एखाद्या आमदाराने पत्रकारच काय पण जनतेतील कुठल्याही व्यक्तीशी अशा पद्धतीने बोलू नये. पाचोराचा राजकीय वारसा सुसंस्कृत आहे. यापूर्वीच्या नेत्यांनी तो कायम ठेवला आणि तो आताच्या नेत्यांनीही जपला पाहिजे. यापूर्वीही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह टीका करताना आक्षेपार्ह वक्तव्य करत घाणेरडी भाषा वापरली होती. बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात इतक्या घाणेरड्या भाषेत कुणाला शिव्या दिल्या नाहीत. आणि याच प्रकरणावर बोलताना बाळासाहेबांचे नाव जोडणं योग्य नाही, असं वैशाली सूर्यवंशी यांनी म्हटलं आहे. लोकप्रतिनिधींनी चांगल्या पद्धतीने काम करून लोकांपुढे आदर्श ठेवला पाहिले, असं म्हणत वैशाली सूर्यवंशी यांनी आपला आमदार भाऊ किशोर पाटील यांच्या कृत्याचा निषेध व्यक्त केला आहे.