सफाई कामगारांचा महापौरांसह आयुक्तांना घेराव
Dhule News धुळे : फक्त दोन वेळा हजेरी घ्या आणि सातवा वेतन आयोग द्या, अशा प्रमुख मागण्यांसह धुळे महानगरपालिकेच्या सफाई कामगारांनी गुरुवारी सायंकाळी महापौरांसह आयुक्तांना अचानक घेराव घातला. त्यामुळे पालिका प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.
हजेरीसाठीचे थम व सातव्या वेतन आयोगाविषयीच्या मागण्यांसाठी सफाई कामगारांचा मोर्चा गुरुवारी सायंकाळी ५ वाजता धुळे महापालिकेत धडकला. मोर्चेकरी थेट आयुक्तांच्या दालनात शिरले. यावेळी महापौर व आयुक्तांनी निवेदन स्वीकारून मोर्चेकरांशी चर्चा केली. मागण्यांबाबत दोन दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तसेच चर्चेसाठी शिष्टमंडळ घेऊन या असे सांगितल्यानंतर मोर्चेकरी परतले. सफाई कामगारांची हजेरी घेण्यासाठी दिवसातून चार वेळा थम घेतले जातात. शहरातील वेगवेगळ्या भागात सफाई कर्मचारी राहतात. काहींची घरे मनपापासून खूप लांब आहेत. काहींजवळ वाहने नाहीत. अशा परिस्थितीत केवळ थमसाठी मनपात दिवसातून चार वेळा ये-जा करणे गैरसोयीचे ठरते. त्यामुळे दिवसातून फक्त दोन वेळा थम घेण्यात यावेत. तसेच सातव्या वेतन आयोगाचा फरक एका टप्प्यात द्यावा, हजेरी पत्रक २५ तारखेला जमा करण्याचे आदेश देऊन ५ तारखेच्या आत पगार करावेत या मागण्यांसाठी सफाई कामगारांनी गुरुवारी सायंकाळी ५ वाजता धुळे महापालिकेवर मोर्चा आणला. मोर्चेकरांनी आयुक्तांच्या दालनात जाऊन मागण्यांविषयी निवेदन दिले. यावेळी महापौर प्रतिभा चौधरी व आयुक्त देविदास टेकाळे यांनी निवेदन स्वीकारून मोर्चेकऱ्यांशी चर्चा करीत त्यांच्या मागण्यांबाबत दोन दिवसात निर्णय घेवू असे आश्वासन दिले. तसेच चर्चेसाठी शिष्टमंडळ घेऊन या असे सांगितल्यानंतर मोर्चेकरी परतले.
निवेदनावर मुनाफ कादर शेख, राजू पगारे, सुनिल चित्ते, दिलीप माळी, प्रकाश गवळी, राजू कांबळे, कुणाल बोरसे, गब्बर शेख, वसीम नुर शेख, बापू खरात, भानुदास भवरे, सलमान शब्बीर शेख, समशेर नादर बेग, अस्लम शिरान शेख, हसन अकबर शेख, सलमान शकील शेख, नवाब गुलाब बेग, कुतुबुद्दीन मुनीर शेख, हुसेन सलीम शेख, हुसेन मेहबूब शेख, अल्ताफ सलीम शेख, ओम बैसाणे यांच्या सह्या आहेत.