महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज : युवकांमधील नव संकल्पनांना चालना
Dhule News धुळे : महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पानांना चालना देण्यासाठी नवउद्योजगांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त रा.नि.वाकुडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
राज्यातील सर्व जिल्हयातील विद्यार्थी नवउद्योजक व त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेवून त्यांना आवश्यक व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच या नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ज्ञ मार्गदर्शन, निधी व आवश्यक पाठबळ पुरवणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी राज्यातील कोणत्याही महाविद्यालय अथवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सध्या शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, विद्यार्थिनी किंवा जास्तीत जास्त 3 विद्यार्थ्यांचा समूह पात्र असेल.
अर्ज करण्यासाठी विद्यार्थी, विद्यार्थिनी, समूहाकडे नावीन्यपूर्ण संकल्पना असणे आवश्यक आहे. हा उपक्रम ३ टप्यात आयोजित करण्यात येणार असून प्रथम टप्यात राज्यातील महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इतर शैक्षणिक संस्थांची नोंदणी करण्यात येत आहे तदनंतर त्या संस्थेतील विद्यार्थी स्टुडंट इनोव्हेशन चॅलेजमध्ये आपल्या नवसंकल्पनांचे अर्ज करू शकतील. संस्थास्तरावर उत्तम दोन संकल्पनांची निवडही प्रथम टप्यात करण्यात येईल.
दुसऱ्या टप्यात जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांकडून प्राप्त झालेल्या उत्तम दोन संकल्पनांमधून, सर्वोत्कृष्ट 100 संकल्पनांची जिल्हास्तरीय सादरीकरणासाठी निवड करण्यात येईल. निवडलेल्या 100 नवउद्योजकांसाठी विशेष एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित येईल. प्रत्येक जिल्हयातील सादरीकरण सत्रातून सर्वोत्कृष्ट 10 विजेते निवडले जातील. सर्वोत्कृष्ट 10 विजेत्यांमध्ये, 30 टक्के महिला, 50 टक्के औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे विद्यार्थी व वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट संबंधित नवसंकल्पनांना प्राधान्य असेल. जिल्हास्तरीय विजेत्यांना प्रत्येकी एक लाख रूपये बीज भांडवल देण्यात येणार आहे.
तिसऱ्या टप्या कत प्रत्येक जिल्ह्यातील 10 अश्या एकूण 360 नवउद्योजकांना 12 महिन्यांचा विशेष इन्क्युबेशन प्रोगाम दिला जाणार असून इन्क्युबेशन प्रोग्रामनंतर या 360 नवसंकल्पानांचे राज्यस्तरीय सादरीकरण करण्यात येणार असून यातून सर्वोत्कृष्ट 10 नवउद्योजकांना प्रत्येकी 5 लाख रूपयांचे बीज भांडवल देण्यात येणार आहे.
या उपक्रमाची विशेष बाब म्हणजे शैक्षणिक संस्था व जिल्हयांना या उपक्रमाची व्याप्ती वाढवून राज्याची नावीन्यपूर्ण परिसंस्था बळकट करण्यासाठी विशेष परितोषिकेही दिले जाणार आहेत. या उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या अधिकृत संकेतस्थळ www.msins.in अथवा www.schemes.msins.in या पोर्टलला भेट द्यावी.
जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये तसेच महाविद्यालयांतील जास्तीत जास्त विद्याथ्यांनी या चॅलेंज मध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहनही कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता चे सहायक आयुक्त श्री. वाकुडे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.