गटई कामगारांना मोफत स्टॉल, समाजकल्याण विभागाची योजना
धुळे : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सन 2023-2024 या आर्थिंक वर्षांसाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल देणे योजनेचा लाभ देण्यासाठी 31 ऑक्टोंबर,2023 पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी केले आहे.
काय आहे योजना?
अनुसूचित जातीच्या व्यक्तींना काम करीत असतांना ऊन, वारा व पाऊस यापासुन संरक्षण मिळावे व त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका व महानगरपालिका व छावणी क्षेत्रामध्ये 100 टक्के शासकीय अनुदानातून गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना सामाजिक न्याय विभाग व संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत राबविण्यात येत आहे.
आवश्यक पात्रता आणि कागदपत्रे
या योजनेचाल लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. अर्जासोबत अर्जदाराचा जातीचा दाखला, अर्जदाराच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी 40 हजार तर शहरी भागासाठी 50 हजार पेक्षा अधिक नसावे. अर्जदाराचे वय 18 पेक्षा कमी व 60 पेक्षा जास्त नसावे (शाळा सोडल्याचा दाखल्याची मूळ प्रत व झेरॉक्सची सांक्षाकित प्रत जोडावी.) रेशनकार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड, रहिवासी दाखला. गटई स्टॉलचा लाभ यापूर्वी एकत्रित कुटुंबात घेतला नसल्याने 100/- रु. स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र. अर्जदार ज्या जागेत स्टॉल मागत आहे ती जागा ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका व छावणी क्षेत्र यांनी भाड्याने,कराराने खरेदीने अगर मोफत परंतू अधिकृतरित्या ताब्यात दिलेली असावी किंवा ती त्याच्या मालकीची असावी. सोबत सातबारा उतारा आवश्यक राहील.गटई पत्रयाचे स्टॉल हे एका कुटूंबात एकाच व्यक्तींला दिले जाईल व यापुर्वी लाभ घेतला असेल तर त्यांना दुबार लाभ मिळणार नाही. लाभार्थ्यांस गटई स्टॉलचा ताबा दिल्यानंतर त्या स्टॉलची देखभाल, दुरुस्ती व वाहतुक खर्च लाभार्थ्यांनी स्वत: करावा लागेल.
या कार्यालयात करा संपर्क
लाभार्थ्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज व कागदपत्रासह परिपूर्ण प्रस्ताव 31 ऑक्टोंबर, 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंचन भवनाच्या मागे,साक्री रोड,धुळे येथे जमा करावेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी कार्यालयाशी प्रत्यक्ष येऊन संपर्क साधावा, असे सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.