ट्रॅक्टर घेण्यासाठी तब्बल 90 टक्के अनुदान
धुळे : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वयंसहायता बचत गटांनी 30 नोव्हेंबर, 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी केले आहे.
स्वयंसहाय्यता बचत गटांना त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे या हेतूने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना 90 टक्के शासकीय अनुदानावर 9 ते 18 अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टिव्हेटर किंवा रोटॅव्हेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करण्यात येणार आहे.
अशा आहेत अटी व शर्ती
अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावा.
स्वयंसहाय्यता बचत गटाचे अध्यक्ष व सचिव हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावा.
स्वयंसहाय्यता बचत गटाने राष्ट्रीयकृत बँकेत बचतगटाच्या नावे बँक खाते उघडावे व सदरचे बँक खाते बचतगटाचे अध्यक्ष व सचिव यांच्या आधारक्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे. तसेच बचतगटाच्या नावाने पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.
लाभार्थी स्वयंसहाय्यता बचत गटांना अनुज्ञेय असणाऱ्या किमान 9 ते 18 अश्वशक्तीपेक्षा जादा अश्वशक्तीचा ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करता येतील. मात्र त्याची किंमत शासकीय अनुदानापेक्षा रूपये 3 लाख 15 हजार जास्त असल्यास कमाल अनुज्ञेय अनुदाना व्यतिरिक्त जादाची रक्कम बचतगटांना स्वतः खर्च करावी लागेल.
मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधनांची कमाल मर्यादा 3 लाख 50 हजार राहील त्यामध्ये 90 टक्के म्हणजेच रूपये 3 लाख 15 हजार शासकीय अनुदान व स्वयंसहाय्यता बचत गटांचा हिस्सा 10 टक्के म्हणजेच रुपये 35 हजार इतका असेल.
लाभार्थी बचत गटांची निवड झाल्यानंतर बचत गटाने कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, कृषी सहकार आणि शेतकरी कल्याण विभागांनी निर्धारित केलेल्या प्रमाणकानुसार मान्यताप्राप्त उत्पादकाकडून मिनी ट्रॅक्टर, ट्रेलर व त्याची उपसाधने शासनाने निर्धारित केलेल्या किंमतीपर्यंत खरेदी करावे.
स्वयंसहाय्यता बचत गटांने मिनी ट्रॅक्टर, ट्रेलर व त्याची उपसाधने अगोदर खरेदी केल्याची पावती सादर केल्यानंतर व खातरजमा करून लाभार्थी बचत गटाला शासकीय अनुदानाचा 50 टक्के हप्ता त्यांच्या बचतगटांच्या आधारसंलग्न खात्यावर जमा करण्यात येईल.
उर्वरित 50 टक्के अनुदान मिनी ट्रॅक्टर, ट्रेलर व त्याची उपसाधने यांची प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंद झाल्यानंतर बचतगटांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल किंवा स्वयंसहाय्यता बचत गटाने मिनी ट्रॅक्टर / ट्रेलर व त्याची उपसाधने यांची प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंद केल्याचे पुरावे सादर केल्यास 100 टक्के अनुदान स्वयंसहाय्यता बचतगटांच्या आधारसंलग्न खात्यावर जमा करण्यात येईल. या योजनेसाठी जास्तीचे पात्र प्रस्ताव प्राप्त झाल्यास त्यातून लॉटरी पद्धतीने शासनाने दिलेल्या लक्षांकानुसार लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल.
असा करा अर्ज
लाभार्थ्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज व कागदपत्रासह परिपूर्ण प्रस्ताव 30 नोव्हेंबर, 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंचन भवनाच्या मागे,साक्री रोड,धुळे येथे जमा करावेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी कार्यालयाशी प्रत्यक्ष येऊन संपर्क साधावा, असे सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.