खासदार सुभाष भामरे यांनी धुळेकरांसाठी दिली महत्वाची बातमी, दहा दिवसात एक दिवसाआड पाणी, धुळे दादर रेल्वे ही लवकरच दररोज
Dhule News धुळे : माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी धुळेकरांसाठी महत्वाची बातमी दिली. येत्या दहा दिवसात एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार असून, धुळे दादर रेल्वेही लवकरच दररोज सुरू होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
धुळे शहरात एका रस्ते कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. खासदार डॉ. भामरे यांनी सांगितले की, अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचा सध्या फक्त एकच पंप सुरू आहे. तरी देखील धुळे शहराला समाधानकारक पाणीपुरवठा सुरू झाला आहे. 33 केव्ही सब स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे येत्या आठ ते दहा दिवसात धुळेकरांना एक दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. अक्कलपाडा योजनेच्या कामाला काही तांत्रिक अडचणींमुळे विलंब झाल्याचेही त्यांनी कबूल केले. तसेच धुळे-दादर रेल्वे सध्या आठवड्यातून तीन दिवस सुरू आहे. या रेल्वे सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने लवकरच ही रेल्वे धुळेकरांच्या सेवेत दररोज फेऱ्या सुरू करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
धुळे शहरात साक्री रोडवरील प्रभाग क्रमांक १५ मध्ये सिंचन भवनच्या मागील रस्त्याचे काँक्रिटिकरण करण्याचा शुभारंभ शनिवारी माजी संरक्षण राज्यमंत्री खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाजपाचे लोकसभा प्रमुख माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भारतीय जनता पक्षाचे महानगर प्रमुख गजेंद्र अंपळकर, महापौर प्रतिभा चौधरी, या भागातील नगरसेवक बन्सी जाधव, नगरसेविका मंगला पाटील, नगरसेवक संजय जाधव, भटू वारकर, मनोहर मोरे, गणेश बोरसे, किरण चव्हाण, संतोष मोरे, अश्विन भोपे, विनोद विधाते, माणिक गूले, हिंमत देवरे, संतोष वैद्य, रवि बोरसे, संजु मोरे, सटवा गवळी, प्रवीण साळवे, दीपेश ललवणी, धनराज राजपूत, लक्ष्मण बोरसे उपस्थित होते.