धुळेकरांच्या पाणीप्रश्नासाठी आमदार काढणार जन आक्रोश मोर्चा
धुळे : शहरातील नागरिकांना एक दिवसाआड नियमित व शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी आमदार फारुख शाह यांनी महानगरपालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आमदार कार्यालयात बोलाविली होती.
सोमवारी झालेल्या या बैठकीत २५ ऑगस्टपर्यंत 33 केव्ही सबस्टेशनचे काम पूर्ण करून आणि येत्या आठ दिवसात पाणी वितरण व्यवस्थेवर विशेष काम करून पाणी वितरण व्यवस्था सक्षम करण्याबाबत चर्चा करण्यात आली. १७ ऑगस्ट रोजी ३३ केव्ही सबस्टेशनची नेमकी स्थिती आणि अक्कल्पाडा योजनेची स्थिती याबाबत पाहणी दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यात महानगरपालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि वीज वितरण कंपनीचे अधिकारी सहभागी असतील. यावेळी मनपा प्रशासनाने अशोकनगर जलकुंभ नवीन बांधण्यासाठी आणि व्हॉल्व बसविण्यासाठी दोन कोटी रुपयांची मागणी केली. त्यानुसार आ. फारुख शाह यांनी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.
धुळे शहरातील नागरिकांना एक दिवसाआड नियमित व शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात अपयशी ठरलेल्या महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात २८ ऑगस्ट रोजी जन आक्रोश मोर्चा काढून मनपा अधिकारी-पदाधिकारी यांचे कुकर्तुत्व जनतेच्या दरबारात मांडणार असल्याचे आ. फारुख शाह यांनी सांगितले.
बैठकीला धुळे महानगरपालिकेचे आयुक्त देविदास टेकाळे, उपायुक्त विजय सनेर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता दिलीप पाटील, वीज वितरण कंपनीचे अभियंता पवार तसेच अभियंता कैलास शिंदे, सहाय्यक अभियंता चंद्रकांत उगले, नरेंद्र बागुल आदी उपस्थित होते.