Dhule News धुळे : भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी स्वतःच्या मालकीची पाच कोटी रुपयांची जागा भाजपला दान केली आहे. या जागेवर पक्षाचे हायटेक कार्यालय उभारणार असल्याची माहिती अंपळकर यांनी रविवारी प्रसारमाध्यमांना दिली. भाजप कार्यालयाला जागा भेट देण्यासंदर्भात पक्षश्रेष्ठींची चर्चा झाली आहे. तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांचे या निर्णयाला समर्थन आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात भाजपचे शहर कार्यालयाचे बांधकाम पूर्ण होईल, असे गजेंद्र अंपळकर यांनी स्पष्ट केले. धुळे शहरात चाळीसगाव चौफुलीलगत मोक्याच्या जागेवर रोडटच असलेला हा भूखंड त्यांनी पक्षासाठी विनामूल्य दिल्याने पक्षश्रेष्ठींकडून त्यांचे कौतुक होत आहे.
गजेंद्र अंपळकर म्हणतात, धुळे शहरात मारुतीनगरमधील चाळीसगाव रोड टच प्लॉट नंबर ८१ व ८२ असे दोन्ही प्लॉट मिळून ५५०० चौरस फुट जागा आहे. त्याची अंदाजे किंमत साडेचार कोटी रुपये आहे. ही जागा भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासाठी वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ देत आहोत. भारतीय जनता पार्टीने माझ्यावर जो विश्वास दाखवला, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री गिरीष महाजन, महामंत्री विजय चौधरी, माजी संरक्षण राज्यमंत्री खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी पर्यटन मंत्री आमदार जयकुमार रावल, आमदार अमरिशभाई पटेल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर प्रतिभा चौधरी, महाराष्ट्र प्रदेश कार्यालय मंत्री रवि अनासपुरे, प्रदेश सह मंत्री भरत राऊत आणि मित्र परिवार यांनी सर्वांनी माझ्यावर जगातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या धुळे जिल्हा महानगर अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. माझ्या कधीही स्वप्नात देखील आले नाही की, शहराचा अध्यक्ष होईल. परंतु परमेश्वराची कृपा आई, कैलासवासी वडील (दादा), माझे मोठे बंधू सतिष अण्णा, माझ्या वहिनी माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांचा आशीर्वाद व तसेच माझी पत्नी अश्विनी अंपळकर, सुहास अंपळकर, सूनबाई धनश्री सुहास अंपळकर, तेजस अंपळकर, आरती अंपळकर, चिरंजीव यश अंपळकर आणि मित्र परिवार यांच्या सर्वांच्या सहकार्याच्या सद्भावनेने मला शहराध्यक्षपद मिळाले.
आम्ही २००८ सालापर्यंत शिवाजीनगर झोपडपट्टी भागात ७ बाय ३० म्हणजे २१० स्केअर फुटच्या घरात राहत होतो. एकीकडे बारदान व फळ्या व दुसऱ्या बाजूने कुडाची भिंत अशा घरात राहत होतो. १९९३ साली १० वी पास झालो व वडिलांनी सांगितले की, आता काहीतरी काम करा व पोट भरा. आता शिकवण्याची आपली परिस्थिती नाही. त्यामुळे हमाली कामाला कॉटन मार्केटमध्ये लागलो. भाजीपाला विक्रीची गाडी काढली. रस्त्यावर पोहे, पापड, बटाटे विकले. एके दिवशी आमच्या वडिलांना आमचे काका कै. मारुती अंपळकर यांचा निरोप आला. घरी मुलांना घेऊन ये. मी, वडील व माझे मोठे भाऊ आम्ही काकांकडे गेलो. त्यांनी आम्हाला सांगितले की, दुधाचा व्यवसाय चालू करा. मग तीन लिटर दुधापासून व्यवसाय चालू केला. व्यवसाय वाढावा यासाठी बाहेरून २० हजार रुपये १० रूपये शेकड्याने घेतले. म्हणजेच महिन्याचे २००० फक्त व्याज. हे व्याज भरताना कधी कधी अशी परिस्थिती आली की घरात किराणा भरण्यासाठी पैसे नसायचे. मग ५० किंवा १०० चा किराणा घरी आणायचो. व्याजामुळे अशी परिस्थिती झाली की रात्रंदिवस कष्ट करून देखील पोट भरायची पंचाईत झाली.
मग राजवाडे बँक व अर्बन बँक येथे कर्जासाठी वडील, मी व भाऊ खेटा मारायला लागलो. त्या ठिकाणी आमचे शेअर्स असताना देखील सहा महिने फिरून कर्ज मिळाले नाही. एके दिवशी माझा मित्र रावेर येथील नथाआबा याने सांगितले की, तुला कर्ज पाहिजे असेल तर तू डॉ. सुभाष भामरे यांच्याकडे जा. ते तुझे काम करतील. माझी ओळख नसतानाही मी बाबांकडे गेलो. बाबांनी मला सांगितले की, युवराज आबा चेअरमन आहे. त्यांना फोन करतो. ते बँकेत असतील त्यावेळेस तु जा, तुझे काम होईल. युवराज आबांनी मला ११ वाजेची वेळ दिली. त्याच दिवशी त्यांच्या हॉटेलचे भूमिपूजन होते. मी सकाळी ११ वाजता बँकेत जाऊन बसलो होतो. संध्याकाळी बँक बंद होण्याची वेळ झाली. शेवटी श सर्वजण निघून गेले. ६.३० वाजता मीही डॉ. बाबांकडे परत गेलो व सर्व हकीकत सांगितली. बाबांनी मला दुसऱ्या दिवशी बँकेत मॅनेजर साहेब असले की माझ्याकडे ये, आपण जाऊ असे सांगितले. नंतर दुसऱ्या दिवशी मी ११ वाजता बँकेत गेलो. तिथे बघितले की, मॅनेजर जगन अग्रवाल बँकेत आहेत. मी परत बाबांकडे गेल्यावर बाबांनी क्षणाचाही विचार न करता त्यांनी आपली गाडी काढली आणि स्वतः ड्रायव्हिंग करत मला बाजूला बसवून बँकेत घेऊन गेले. त्या दिवशी मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच गाडीत बसलो. अतिशय आनंद झाला. बँकेत गेल्यावर साहेबांनी आम्हाला कॅबिनमध्ये बसविले व विचारले की, किती कर्ज हवे आहे. मग बाबांनी मला विचारले एक लाख रुपयेचे कर्ज करायचे का? एक लाखाचा आकडा ऐकूण इतका आनंद झाला की, माझा आनंद गगनात मावेनासा झाला. आठ दिवसामध्ये कर्ज मिळाले. आमच्याकडे प्रॉपर्टी नसल्याने त्या कर्जासाठी आमचे काका कै. मारुती अंपळकर यांनी स्वतःचे घर तारण ठेवले. तिथूनच आमचे दिवस बदलले आणि आम्ही परत मागे वळून बघितले नाही.
माझ्या आयुष्यातील माझे स्वप्न होते की, पत्र्याचे न गळणारे घर व नवी सायकल. पाऊस जर आला तर १० ते १२ भांडे लावायला लागायचे. एवढे घरावरचे पत्रे गळायचे. जास्त पाऊस आला तर झोपायचे देखील वांधे व्हायचे. असे होते आमचे घर.
प्रत्येक माणसाला जीवनात संपूर्ण परिवार सुखी समाधानी राहण्यासाठी पैसा आवश्यक असतो. मला पैसा, गाडी, बंगला, बायको, मुलं व संपूर्ण परिवार माझ्या मनासारखा भेटला. माझ्या अपेक्षेपेक्षाही मला जे मिळाले ते खूप जास्त आहे. ८ मे २००५ रोजी आमचे वडील स्वर्गवासी झाले. खूपच धक्का बसला. परंतु परमेश्वराने हिम्मत हारू दिली नाही. नंतर स्वतः अधिक जोमाने कामाला लागलो. स्वतःचे घर बांधले. ते घर बांधायला चार वर्षे कालावधी लागला. पैशांअभावी घराचे काम बंद ठेवावे लागले. माझा मित्र बापू चौधरी याने मला विचारले, काम का बंद ठेवले आहे. त्यावर मी त्याला सांगितले पैसे नाहीत. त्याने मला दोन लाख रुपये आणून दिले व आमचे घराचे काम पूर्ण झाले.
आता सर्व काही सुखा समाधानात आहे. एवढे मोठे पद मिळाले, म्हणून संपूर्ण परिवार खूपच आनंदी झाला आहे. मला स्वतःला जनसामान्यांना मदत करण्याची लहानपणापासूनच आवड होती. आमच्या संपूर्ण परिवाराला देखील जनसेवेची खूप आवड आहे. संपूर्ण परिवाराला अंतिम सत्य हे मृत्यू आहे यांची जाण आहे. म्हणून, भारतीय जनता पार्टीने जो विश्वास दाखवून नगरसेवक व उपमहापौरपद दिले हे आमचे भाग्य.
आता मला जे पद मिळाले आहे, त्यामुळे आपण भाजपचे पालक या नात्याने परिवार खूप मोठा आहे. परिवार एकत्र राहण्यासाठी, सुखी समाधानी राहण्यासाठी जशी घराची गरज असते तशी पार्टी वाढवण्यासाठी पार्टी कार्यालयाची गरज असते. म्हणून आमच्या संपूर्ण परिवाराने विचार केला की, इकडे तिकडे जागा बघण्यापेक्षा, स्वतःची जागा वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्याचे ठरविले आहे.
भविष्यात मोठे संघटन उभे करून व जास्तीत जास्त चांगली कामे कशी करता येतील हा प्रयत्न आपण सर्वच जण मिळून करू या. पैसे हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. परंतु पैसाच सर्व काही नाही. ही आमच्या परिवारास जाण आहे.
या आधीही आम्ही हर हर महादेव विजय व्यायम शाळा स्वतःच्या १० हजार स्केअर फुट जागेत बांधली आहे. व्यायाम शाळा बांधून १७ वर्षे पूर्ण झालेली आहेत. या व्यायाम शाळेत प्रॅक्टिससाठी येणाऱ्या मल्लांची संख्या १२५ ते १५० च्या आसपास आहे. दोन कोच आहेत. अत्याधुनिक असे साहित्य आहे. आतापर्यंत आमच्या व्यायाम शाळेतून २० ते २५ मुले आर्मी, पोलीसमध्ये भरती झाले आहेत. आतापर्यंत नॅशनलचे २२ मेडल मिळालेले आहेत. आमच्या व्यायाम शाळेत कुठल्याही प्रकारची फी घेतली जात नाही. मला जेव्हा पद मिळाले होते तेव्हा मी शब्द दिला होता की, लवकरात लवकर मी आपल्या पक्षाचे कार्यालय उभे करेल. दिलेला शब्द पूर्ण करण्याचा प्रयत्न म्हणून आम्ही ही जागा देत आहोत. या कार्यालयात दिल्ली, मुंबईसारखे हाईटेक कार्यालय पक्षाच्या प्रोटोकॉलनुसार, प्रत्येक विभागानुसार स्वतंत्र कार्यालय तसेच मान्यवर व ज्येष्ठ नेत्यांसाठी राहण्याची सोय, जेवणाची सुविधा, पार्किंगची भव्य सोय राहणार आहे. तसेच कार्यालय हे महामार्गाच्या जवळ असल्याने पाहुण्यांना, मान्यवर नेत्यांना उतरण्याची सोय होईल. लवकरात लवकर वरिष्ठांशी व सर्व नेत्यांशी चर्चा करून कार्यालयाचे बांधकाम चालू करण्यात येईल. आम्ही येथे पोहोचलो त्यात सिंहाचा वाटा खासदार डॉ. सुभाष भामरे यांचा आहे.