पिस्तूल लावून महामार्गावर लूटमार करणारी मिरची गॅंग पोलिसांच्या जाळ्यात
धुळे : शहरा लगत असलेल्या महामार्गांवरिल पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून नागरिकांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून पिस्तुलचा धाक दाखवून लुटण्याच्या घटना समोर आल्या होत्या.त्यामुळे या टोळीची नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली झाल्याने मिरची गॅंग चा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान असताना आझाद नगर पोलीस ठाण्याच्या पथकाने या टोळीच्या मुस्क्या आवळल्या आहेत. शेखर दत्तू वाघमोडे, चेतन जिभाऊ पाटील, आणि विकास संजय केदारे, या तिघांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल एक जिवंत काडतुस 6 मोबाईल असा एकूण दोन लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
धुळे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून महामार्गावर जबरी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. प्रवाशांच्या डोळ्यात मिरची पुड फेकून आणि गावठी बनावटीच्या पिस्तूलचा धाक दाखवून त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल व मोटारसायकल हिसकावून पळून जाण्याचे गुन्हे घडले. याबाबत पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी सदर प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना निर्गमीत केल्या होत्या.
दरम्यान, १५ ऑगस्ट रोजी 11.30 ते १६ ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेच्या दरम्यान आझादनगर पोलीस ठाणे हद्दीत गिंदोडिया चौक येथे नाकाबंदी व कोबिंग ऑपरेशन राबविण्यात आलेले होते. यावेळी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली. तीन इसम एका पांढऱ्या रंगाच्या एक्टिवा मोटारसायकलवर (क्र. एम. एच. १८ बी. पी. ६३०८) बसून पारोळा चौफुलीकडून गिंदोडिया चौकाकडे येणार आहेत. त्याच्या कब्जात बनावटीचे पिस्तूल आहे. ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी आझादनगर पोलीस ठाण्याकडील सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व शोध पथकातील कर्मचाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले.
या पथकाने गिंदोडीया चौकात दुचाकीवरील शेखर दत्तू वाघमोडे (वय २३, रा. भोकर, ता. जि. धुळे), चेतन जिभाऊ पाटील, (वय ३०, रा. भोकर, ता. जि. धुळे), विकास संजय केदारे (वय २५, रा. पश्चिम हुडको, साईबाबा मंदिराजवळ, चाळीसगाव रोड धुळे) अशा तीन इसमांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस मिळून आले. म्हणून सदर इसमांना ताब्यात घेवून आझादनगर पोलीस ठाणे येथे आणून त्यांच्याविरूध्द भादंवि कलम ३४ सह भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३/२५/२७ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख करीत आहेत.
तीन गुन्ह्यांची कबुली
नमूद गुन्ह्याच्या तपासात असताना आरोपींना विश्वासात घेवून त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली असता. त्यांनी तीन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. ०९ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास नगावबारीच्या पुढे पोदार इंटरनॅशनल शाळेजवळ मुबई-आग्रा महामार्गावर एका इसमास आवाज देवून थाबविले. तू भूषणला का मारले? असा प्रश्न विचारत त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. त्याच्या शर्टच्या खिशातून मोबाईल काढून त्याला ढकलून दिले. त्यांच्याकडील मोटारसायकलही हिसकावून घेतली. याबाबत पश्चिम देवपूर येथे संपर्क साधून अभिलेख तपासणी केली असता, त्याबाबत पश्चिम देवपूर येथे भादंवि कलम ३९४, ३४ प्रमाणे गुन्हा १० ऑगस्ट रोजी दाखल असल्याचे दिसून आले.
तसेच १३ ऑगस्ट रोजी रात्री नगावबारी येथून चोरलेल्या दुचाकीवरून ट्रिपल सीट बसून गरताड गावाचे शिवारातील तिखी फाटा येथे येवुन एका इसमास दुचाकीवरून खाली पाडले. त्याच्यावर गावठी बनावटीचे पिस्तूल रोखून त्यास शिवागळ व दमदाटी करून त्याच्याकडून एक मोबाईल, एक होंडा कंपनीची युनिकॉर्न, दुचाकी मोटारसायकल व रोख रक्कम असे हिसकावले, असे सांगितले. मोहाडी नगर पोलीस ठाणे येथे संपर्क साधून अभिलेख तपासणी केली असता, त्याबाबत भादंवि कलम ३९२, ३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा १४ ऑगस्ट रोजी दाखल असल्याचे दिसून आले.
तसेच १४ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास तीखी फाटा येथून चोरलेल्या युनिकॉर्न मोटार सायकलचा वापर करून साक्री रोड हायवेवरील मोराणे गावाच्या बस स्टॉपजवळ एक पुरुष व एक महिला यांना गावठी पिस्तूलचा धाक दाखवून त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली आणि त्यांच्याजवळील दोन मोबाईल, सोन्याचे मंगळसूत्र व रोख रक्कम असे हिसकावून चोरी करून पळून गेलेला होता, असे सांगितले. धुळे तालुका पोलीस ठाणे येथे संपर्क साधून अभिलेख तपासणी केली असता त्याबाबत धुळे तालुका पोलीस ठाणे येथे भाग भादंवि कलम ३९२, ५०६, ३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा १५ ऑगस्ट रोजी दाखल असल्याचे दिसून आले.
या संशयितांकडून पश्चिम देवपूर पोलीस ठाणे, धुळे तालुका पोलीस ठाणे व मोहाडी नगर पोलीस ठाणे येथे दाखल असलेले तीन जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
जप्त केलेला मुद्देमाल असा
आझादनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील गावठी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस, तीन मोबाईल व एक्टिवा मोटरसायकल असा एकूण एक लाख सहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल, पश्चिम देवपूर येथे दाखल गुन्ह्यातील एक सुपर स्प्लेंडर दुचाकी वाहन (क्रमांक एम .एच १८ ए. एच. ०५०३) व एक ओप्पो कंपनीचा मोबाईल असा एकूण ३७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल आणि मोहाडी उपनगर येथे दाखल गुन्ह्यातील एक होंडा कंपनीची युनिकॉर्न दुचाकी मोटार सायकल वाहन (क्रमांक एम. एच. ०६ ए. व्ही. ७९९३), एक रिअल मी कंपनीचा मोबाईल असा एकूण ७७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
धुळे तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील दोन मोबाईल, सोन्याचे मंगळसूत्र असा एकूण २४ हजार ५०० रूपये किमतीचा मुद्देमाल, असा एकूण २ लाख ४४ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नमूद आरोपी यांना दिनांक १६ ऑगस्ट रोजी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने १८ ऑगस्ट रोजी पावेतो पोलीस कोठडी रिमांड दिलेली आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश रेड्डी, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली एपीआय संदीप पाटील, सहा फौजदार प्रकाश माळी, हवालदार योगेश शिरसाठ, मुक्तार मन्सूरी, पोलीस नाईक गौतम सपकाळे, संदीप कढरे, योगेश शिंदे, अनिल शिंपी, अझरोद्दिन शेख, सचिन जगताप, पंकज जोंधळे, चालक हरिष गोरे यांनी केली.