शेतकऱ्यांनो सावधान! सोनगीरला बनावट खतांची विक्री
धुळे : बनावट मिश्र खतांची विक्री करणे, विक्री केंद्र तपासणीत अनियमितता आढळुन आल्याने जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय भरारी पथकांकडून लक्ष्मी ट्रेडर्स, सोनगीर, ता. धुळे यांचा रासायनिक खत विक्री परवाना व घाऊक खत विक्री परवाना रद्द करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कुरबान तडवी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय भरारी पथकाकडून लक्ष्मी ट्रेडर्स, सोनगीर या दुकानाची तपासणी केली असता. ग्रीनफील्ड ॲग्रोकेमिकल प्रा. लि. या कंपनीचे उगम प्रमाणपत्र घाऊक परवान्यामध्ये समाविष्ट न करता भूमी क्रॉप सायन्स, धुळे या अनधिकृत विक्रेत्यामार्फत जिल्ह्यातील किरकोळ खत विक्रेत्यांना अनधिकृत संशयित दाणेदार 18;18;10 हे मिश्रखत साठ्याचा पुरवठा केला. सदर विक्रेत्यांनी खत नियंत्रण आदेश 1985 चे खंड मधील तरतुदी तसेच अत्यावश्यक वस्तु कायदा 1955 मधील कलम 3 (2) व 7 चे उल्लंघन केले असल्याचे सुनावणी दरम्यान आढळुन आले. त्यानुसार लक्ष्मी ट्रेडर्स, सोनगीर यांचा रासायनिक खत विक्री परवाना क्रमांक LCFRDO620220331 व घाऊक खत विक्री परवाना LCFWDO620220049 रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
तसेच जिल्ह्यातील इतर 32 रासायनिक खत विक्रेत्यांनी भूमी क्रॉप सायन्स, धुळे व लक्ष्मी ट्रेडर्स, सोनगीर ता. जि. धुळे यांचेमार्फत मे. ग्रीनफील्ड ॲग्रो केमिकल प्रा. लि. या कपंनीचे उगम प्रमाणपत्र परवान्यामध्ये समाविष्ट न करता घाऊक विक्रेत्यांकडून पुरवठा झालेले अनधिकृत संशयीत दाणेदार 18;18;10 या मिश्रखताचा साठा करुन शेतकऱ्यांना विक्री केल्याचे तपासणीत प्रत्यक्षदर्शी आढळुन आले. त्यांनी खत नियंत्रण आदेश 1985 चे खंड 3 मधील तरतुदी तसेच अत्यावश्यक वस्तु कायदा 1955 मधील कलमानुसार त्यांचा विक्री परवाना पुढील आदेश होईपर्यंत निलंबित करण्यात आला आहे.
रासायनिक खते विक्रीतुन मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणुक होण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे शेतकरी बांधवांना मोठया प्रमाणात नुकसान सहन करावे लागते. असे प्रकार घडू नये यासाठी कृषि विभाग विशेष लक्ष ठेवत असून शेतकरी बांधवांची फसवणूक केल्यास कृषि केंद्र चालकांचा परवाने रद्द केले जाणार आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खते, बियाणे, किटकनाशके यांची खरेदी करतांना कृषि निविष्ठा विक्री केंद्रातुन बिलाची पक्की पावती घ्यावी, तसेच अनधिकृत असे काही आढळल्यास कृषि विभागाला माहिती द्यावी. कृषि केंद्र चालकांनीही बोगस खते, बियाणे, किटकनाशके यांची विक्री करु नये असे प्रकार आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल. जादा दराने विक्री किंवा इतर अनावश्यक खतांची लिंकींग करीत असल्याचे आढळुन आल्यास मोबाईल क्रमांक 8275639468/ 9403415675 वर माहिती द्यावी. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. तडवी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.