दुधात भेसळ आढळलेल्या 8 दुध विक्रेत्यांवर कारवाई
Dhule News धुळे : जिल्ह्यात दुध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय समितीची स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या संयुक्तीक पथकांने आज दुधात पाण्याची भेसळ आढळलेल्या 8 दुध विक्रेत्यावर कारवाई केली आहे.
ही कारवाई समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, अपर पोलिस अधिक्षक किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न) संतोष कांबळे, अन्न व औषध प्रशासनाचे डॉ.आर.एम.शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अमित पाटील, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, संतोष दलाल, निरिक्षक वैध मापन शास्त्र धुळे-2 कृष्णा नेरकर, क्षेत्रसहायक व्ही.व्ही.गरुड, सहायक जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, प्रितेश गोंधळी, पोलीस विभागातील पोलीस हवालदार रविंद्र बेडसे तसेच वसुधारा दूध डेअरीतील दूध तपासणी तंत्रज्ञ मनोज पाटील यांच्या पथकाने ही तपासणी केली.
या पथकाने आज धुळे शहरातील चाळीसगांव रोड,80 फुटी रोड, वडजाई रोड, पारोळा रोड, गल्ली नंबर 4, साक्री रोड, जमनागिरी रोड, मालेगांव रोड तसेच दुध पुरवठा फेरीवाले यांचे कडील दुधाची तपासणी स्वयंचलित उपकरणाद्वारे करण्यात आली. सदरच्या कारवाईमध्ये एकूण 14 दुध विक्रेत्यांच्या दुधाने नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असता, त्यापैकी एकुण 8 दुध विक्रेत्यांच्या दुधात पाण्याची भेसळ आढळून आलेली आहे. भेसळ आढळुन आलेले सरासरी 725 लिटर (गाय दुध 90 लिटर व म्हैस दुध 635 लिटर ) दुध नष्ट करण्यात आले.
तसेच वैध मापन शास्त्र विभाग,धुळे यांच्यासोबत संयुक्त पथकाद्वारे दुध मोजण्याची मापे, इलेक्ट्रॉनिक तोलन यंत्र यांचे मुद्रांकनाची पडताळणी करण्यात आली असता, काही डेअरीतील मापे ही अवैध स्वरुपाची आढळुन आल्याने वैध मापन शास्त्र अधिनियम 2009 अंतर्गत सदर 6 दुध विक्रेत्यांवर खटले नोंदविण्यात आले आहे.
दुध विक्रेत्यांना कळविण्यात येते की, दुध भेसळ करणे हा कायद्याने गुन्हा असून दुध भेसळ करणाऱ्यांवर यापुढील काळात कठोर कारवाई करण्यात येईल, याबाबत नागरिकांनीही जागरुक राहावे असे जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी डॉ. अमित पाटील, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संतोष कांबळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
या दुध विक्रेत्यांवर केली कारवाई
अमोल मिल्क सेंटर, पारोळा रोड, चौफुली, धुळे, बापु श्रीराम पाटील, आनंदा डोंगर धनगर, रा. वरखेडी ता. जि. धुळे वीर प्रभु महावीर दुग्धालय, ग. नं. 4, धुळे, कुश दुध डेअरी, वडजाई रोड, धुळे, शिवशंभु मिल्क ॲण्ड प्रोडक्ट, 100 फुटी रोड, धुळे, लारा दुग्धालय, मालेगाव रोड, दसेरा मैदान, धुळे, सुरेंद्र डेअरी, साक्री रोड, धुळे.
हेही वाचा