भाजप खासदारांच्या घरासमोर शिवसेनेचे आंदोलन आक्रमक आंदोलन
धुळे : भाजपचे खासदार सुभाष भामरे यांच्या घरासमोर इतके खड्डे पडले आहेत की त्यांच्या घरासमोर चांद्रयानाची लॅंडिंग करावी, अशी खोचक टीका शिवसेनेचे उप महानगरप्रमुख संदीप चौधरी यांनी केली.
खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या निवासस्थानासमोरील ८० फुटी रोडवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. संपूर्ण ८० फुटी रोडची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. या रस्त्याने दिवसभरात हजारो नागरिक वाहनाने ये-जा करतात. त्यात शाळकरी मुले, गर्भवती माता, वृद्ध व्यक्ती अशांना या खड्ड्यांमुळे शारिरीक त्रासाला सामोरे जावे लागते. तसेच खड्ड्यांमध्ये पाणी साचते. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव होतो. खासदार डॉ. सुभाष भामरे हे पाच वर्षे संरक्षण मंत्री होते. गेल्या नऊ वर्षांपासून ते खासदार आहेत. त्यांच्या निवासस्थानापासून जाणारा हा रस्ता खासदारांना दिसत नाही का ? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी व खासदार भामरेंनी जनतेचा खासदार या नात्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश देवून या रस्त्याचे डांबरीकरण व दुरुस्ती करावी.
अन्यथा शिवसेनेच्या (उबाठा) वतीने नागरिकांना सोबत घेवून खासदार भामरे यांच्या घरासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे माजी नगरसेवक पुरुषोत्तम जाधव, उपमहानगरप्रमुख संदीप चौधरी, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे पंकज भारस्कर, उपमहानगरप्रमुख आबा भडागे, विभागप्रमुख सागर निकम, संजय जगताप, गौरव पाटील, विलास खेमनार, भरत चौधरी, प्रवीण चौधरी, देवा भांडारकर, हर्षल वाणी, प्रवीण जोंधळे, सागर साळवे, जितेंद्र मराठे, वसंत सोनार, आदेश जाधव, जयेश दुसाने, भाऊसाहेब चौधरी, राहुल जोंधळे यांनी दिला आहे.