विश्वनाथ गावात महिलांसाठी शौचालय बांधलेच नाही; शासनाच्या निधीचा अपहार
धुळे (प्रतिनिधी) : तालुक्यातील विश्वनाथ गावात महिलांसाठीच्या शौचालयाचे बांधकाम न करता शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
असा झाला अपहार : विश्वनाथ गावात महिलांसाठी शौचालयाचे बांधकाम करण्याकरिता बीआरजीएफ योजनेंतर्गत विश्वनाथ ग्रामपंचायतीला सन 2015-16 मध्ये निधी प्राप्त झाला होता. ग्रामपंचायतीने शौचालयाचे बांधकाम सुरू केले खरे; पण काम अपूर्ण सोडून दिले. नंतर हे बांधकाम कधीही पूर्ण झाले नाही आणि तरीही जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने अंतिम देयक अदा केले, असे गावकरी सांगतात. कामामध्ये गैरव्यवहार केल्याचे दिसून येत आहे. ग्रामसेवक, सरपंच आणि संबंधित अभियंता यांनी संगमत करून लाखो रूपयांचा अपहार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
कामाच्या चौकशीची मागणी : परंतु सरपंच आणि ग्रामसेवकाच्या दहशतीला घाबरून ग्रामस्थ तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. पण जिल्हा परिषद प्रशासनाने या कामाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
सार्वजनिक शौचालय नसल्याने गावातील महिलांची मोठी गैरसोय होत असल्याचे सांगण्यात आले.