राज्यातील एकलव्य शाळा शिक्षकांचे 5 सप्टेंबरपासून आमरण उपोषण
नाशिक : पाच वर्षे उलटूनही परिविक्षा कालावधी विलोपित न झाल्याने महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी नाशिक तथा आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य संचलित एकलव्य मॉडेल रेसिडेन्सीयल स्कूलमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पाच सप्टेंबरपासून कर्तव्यावर हजर राहून आमरण उपोषण सुरू करणार आहेत.
महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी नाशिक तथा आयुक्त, आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य संचलित एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती सन 2018 आणि 2019 मध्ये झाली होती. पदभरतीमधील जाहिरात आणि नियुक्ती आदेशामध्ये स्पष्टपणे नमूद केलेले होते की, तीन वर्ष परिवीक्षा कालावधी पूर्ण झाल्यावर कर्मचाऱ्यांचे मूल्यमापन अहवाल समाधानकारक असल्यास कर्मचाऱ्यांना नियमित करून वेतनश्रेणी देण्यात येईल. परंतु सर्व कर्मचारी यांचे कामांचे मूल्यांकन अहवाल जाऊनही परिवीक्षा कालावधी विलोपित झाला नाही. म्हणून सर्व कर्मचाऱ्यांनी प्रकल्प अधिकारी, प्रधान सचिव, आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र तसेच मुख्यमंत्रींपर्यंत वारंवार निवेदने दिली.
तसेच या दोन्ही 2018 व 2019 बॅचचे दोन प्रतिनिधी नेस्ट जनजाती मंत्रालय भारत सरकार दिल्ली येथे चर्चेसाठी दिनांक 28 जुलै 2023 रोजी गेले होते. तरीही कर्मचाऱ्यांचा पारीविक्षा कलावधी विलोपित झाला नाही. 2018 व 2019 मधील कर्मचाऱ्यांना अनुक्रमे 6 वे व 5 वे वर्ष चालू असून, या सर्वांमुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान आणि मानसिक खच्चीकरण होत आहे. एक शिक्षक, अधिक्षक, अधीक्षिका व कर्मचारी महाराष्ट्रतील कानाकोपऱ्यात आणि अती दुर्गम भागात काम करुन आदिवासी मुलांना मुख्य प्रवाहात आणणाऱ्या आणि भारतातील सुजाण नागरिक घडविणारा मात्र त्यांच्या हक्कापासून वंचित आहे.
या सर्व परिस्थितीपुढे हतबल होऊन दिनांक 5 सप्टेंबर 2023 पासून महाराष्ट्रातील सर्व एकलव्य शाळेवर कर्तव्यावर हजर राहून आमरण उपोषण करणार आहेत.