हिरे रुग्णालयातील अनागोंदी कारभार थांबविण्याच्या आमदारांच्या सूचना
धुळे : येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात सुरू असलेला अनागोंदी कारभार आणि गैरव्यवहार त्वरित थांबवा. अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, अशा सूचना आमदार फारुख शाह यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या.
हिरे रुग्णालयात दाखल रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून औषधे किंवा रक्त आणण्यास भाग पाडू नये. काही अडचणी असल्यास आमदार कार्यालयाला कळवाव्यात. त्या अडचणी सोडविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जातील. रक्ताचा तुटवडा असेल तर आमचे कार्यकर्ते वेळोवेळी येऊन रक्तदान करतील, असे आमदारांनी अधिष्ठाता यांच्याशी बोलताना सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे अर्थसंकल्पातील तरतुदी अंतर्गत भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे निवासी वैद्यकीय अधिकारी यांचे निवासस्थान बांधकामांचा शुभारंभ आमदा फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला. धुळे येथील भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्याने रुग्णांवर तात्काळ उपचार होण्यास अडचणी आहेत. परंतु निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा आपल्या हॉस्पिटलच्या अंतर्गत निवास असल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवा देण्यात व उपचार करण्यात लवकर शक्य होईल. यासाठी आमदार फारुख शाह यांनी शासनाकडे निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्या निवासस्थानासाठी प्रयत्न केले होते. त्याला आज यश आले असून हिरे मेडिकल कॉलेज येथे निवासी वैद्यकीय अधिकारी यांचे निवास बांधणे कामाचा शुभारंभ होत आहे. यापूर्वी भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे ज्या मूलभूत सुविधा पाहिजे होत्या त्यासाठी आमदार फारुख शाह यांच्या प्रयत्नाने अंतर्गत रस्ते, आवार भिंत, भूमिगत पाण्याची टाकी, वसतिगृह यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आजपर्यंत आणलेला आहे. वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील मूलभूत सुविधांसाठी सुद्धा कोट्यवधी रुपयांचा निधी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या कार्यक्रमाला भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण मोरे, अधिक्षक डॉ. अजित पाठक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता ईसे, कनिष्ठ अभियंता चव्हाण, नगरसेवक नासिर पठाण, नगरसेवक गनी डॉलर, नगरसेवक आमिर पठाण, डॉ. दीपश्री नाईक, डॉ. बापुराव पवार, आसिफ शाह, प्यारेलाल पिंजारी, निजाम सय्यद, फकिरा बागवान, हलीम शमसुद्दिन, माजिद पठाण, जीड्या पहिलवान, सिराज मलिक, आकिब अली, समीर शाह, नजर खान, फैसल अन्सारी, समीर खान आदी उपस्थित होते.