तिकीट कोणाला द्यायचे हा पक्षश्रेष्ठींचा विषय!
धुळे : भारतीय जनता पक्षामध्ये निवडणुकीचे तिकीट कोणाला द्यायचे याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असतात असे स्पष्टीकरण खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी रविवारी प्रसार माध्यमांशी बोलताना दिले.
ऑगस्ट महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांनी धुळ्यात पत्रकार परिषद घेऊन पक्षाने धुळे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली तर आपण ती पार पाडू असे वक्तव्य केले होते. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचे तिकीट विद्यमान खासदार सुभाष भामरे यांना मिळते की प्रतापराव दिघावकर यांना मिळते याविषयीच्या चर्चांना उधाण आले आहे. यासंदर्भात खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी हा निर्णय पक्षाचा असल्याचे स्पष्ट केले.
खासदार डॉ. भामरे म्हणाले की, देशामध्ये लोकशाही आहे. शिवाय भारतीय जनता पक्ष हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. या पक्षात अनेकजण कुठल्या ना कुठल्या इच्छेने प्रवेश करीत असतात. परंतु तिकीट कोणाला द्यायचे आणि कोणाला द्यायचे नाही हा अधिकार नेत्यांचा आहे. जे इच्छुक पक्षासमोर येतात त्यांनी केलेल्या कामांचा आणि सगळ्या गोष्टींचा विचार करून योग्य उमेदवाराला तिकीट दिले जाते. इच्छुक अनेक असू शकतात. इच्छा दाखविणे हे काही गैर नाही. भारतीय जनता पक्षाची रचना वेगळी आहे. त्यामुळे योग्य कार्यकर्त्यालाच न्याय मिळतो. शेवटी तिकीट कोणाला द्यायचे हा नेत्यांचा विषय आहे. त्याच्यावर मी काही बोलणे उचित नाही. आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत. पक्षाचा कोणताही आदेश आम्हाला मान्य असतो. आमच्यासाठी सर्वात प्रथम देश आहे. त्यानंतर पक्ष आणि सर्वात शेवटी आम्ही स्वतः आहोत. भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनात हे ब्रीद कोरले गेले आहे. त्याच्यामुळे आम्ही कधीही मीडियाच्या समोर तिकिटाचा विषय घेत नसतो, असे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा