समाजवादी पार्टीची मोदी सरकारवर घणाघाती टीका
धुळे : देशभरात महागाई व बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. जाती-धर्मात तेढ निर्माण करून मोदी सरकार (Modi Sarkar) मूळ प्रश्नांना बगल देत आहे. महाराष्ट्रात तर ट्रिपल इंजिन सरकार आहे. तरीही धुळेकर तहानलेले आहेत. याशिवाय दुर्दैवाची बाब ती काय?, असा सणसणीत टोला समाजवादी पार्टीचे (Samajvadi Parti) प्रदेशाध्यक्ष फहाद अहमद यांनी रविवारी धुळ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत लगावला. समाजवादी पार्टीतर्फे उत्तर महाराष्ट्रात जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त ते धुळे शहरात आले होते.
पत्रपरिषदेला समाजवादी पार्टीचे युवा जनसभा प्रदेशाध्यक्ष फहाद अहमद (Fahad Ahmad) यांच्यासह प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्षा माया चौरे, धुळे महानगराध्यक्ष गुड्ड काकर, धुळे जिल्हा प्रमुख महासचिव जमिल मन्सुरी, प्रदेश सचिव अकिल अन्सारी, नगरसेवक डॉ. सरफराज यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
फहाद अहमद म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या (BJP) कार्यकाळात महागाई, बेरोजगारी चरमसिमेला पोहचली आहे. लोकांच्या समस्या सोडविणे हा राजकारणामधील प्रमुख हेतू असतो. मात्र आज तसे घडतांना दिसून येत नाही. आज सर्व जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम मोदी सरकार करीत आहे. परिणामी, जनतेमधील सुसंवाद कमी झाला असून देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. मुस्लीम बांधवांवर ठिकठिकाणी अन्याय, अत्याचार होताना दिसून येत आहेत. सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. सरकारने जनतेच्या पैशांची लूट चालवली असून जनतेचा पैसा उद्योजक अडाणींच्या घशात टाकला जात आहे. व तो पैसा विविध मार्गाने वळविला जावुन फार मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. यात जनतेची दिशाभुल केली जात आहे. सत्तेत येण्यापुर्वी काळा पैसा स्विस बँकेतून आणण्याचा वायदा मोदी सरकारने जनतेशी केला त्याचे काय झाले ? ९ वर्षात एक फुटकी कवडी काळा पैसा म्हणून मिळालेला नाही.
महाराष्ट्राची भुमी संतांची, महापुरुषांची म्हणून ओळखली जाते. मात्र येथेही जाती, (Maratha Reservation) धर्मात आरक्षणासारख्या मुद्यांवरून भांडणे लावली जात आहेत. लव्ह जिहादचा (Love Zihad) आरोप मुस्लीम धर्मियांवर केला जात होता. यासंदर्भात पक्षाचे अध्यक्ष अबु आजमी यांनी काढलेल्या माहितीत शुन्य लव्ह जिहादची नोंद असल्याचे निष्पन्न झाले. समाजवादी पक्ष गरीबांसाठी काम करत असून आगामी निवडणूकांमध्ये समाजवादी पक्ष यासंदर्भात अधिक मजबुतीने काम करणार असल्याची ग्वाही फहाद अहमद यांनी यावेळी दिली.
प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्षा माया चौरे (Maya Chaure) यांनी देशात अराजकतेचे वातावरण पसरले असून जाती, धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून केले जात असल्याचा आरोप केला. देशात रोजगार नाही, शिक्षण व्यवस्थेचे तिनतेरा झाले आहेत. बेरोजगारीची समस्या गंभीर झाली आहे. हे कमी झाले की काय मणिपुर राज्यात जमिनी हडपण्यासाठी दंगली घडविल्या जात असल्याचा आरोपही माया चौरे यांनी यावेळी केला. याचा निषेध म्हणून समाजवादी पार्टीने जनसंवाद यात्रेचे आयोजन केले असून २ ऑक्टोबर रोजी रॅलीचे आयोजन केले असल्याचे माया चौरे यांनी यावेळी स्पष्ट केले.