उध्दव ठाकरेंनी दिव्यांग मंत्रालय दिले नाही म्हणून गुवाहाटीला गेलो!
धुळे : महाविकास आघाडीचे सरकार असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिव्यांग मंत्रालय देण्यास नकार दिलाने गुवाहाटी ला जावे लागले. बदनाम झालो पण बदल्यात दिव्यांग मंत्रालय निर्माण केले. उद्धव ठाकरेंना वारंवार दिव्यांग मंत्रालयाबाबत विनंती केली होती. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी बुधवारी धुळ्यात केली. दिव्यांग बांधवांसाठी काम केले म्हणून 350 गुन्हे दाखल झाले. पण मी त्याची पर्वा केली नाही. आमच्याजवळ पक्ष नाही, झेंडा नाही, काहीही नाही फक्त दिव्यांगांचे आशीर्वाद आहेत. दिव्यांग बांधवांनी आत्मविश्वासाने जगले पाहिजे तरच चित्र बदलेल. दिव्यांगासाठीचे काम राजकारणासाठी नाही. कारण राजकारण वेगळे आणि सेवा वेगळी आहे. दिव्यांग बांधवांसाठी मंत्रीपद घेतले नाही, दिव्यांगांसाठी मंत्रालय झाले ही महत्त्वाची गोष्ट आहे. दिव्यांग बांधवांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी पुन्हा धुळ्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
धुळ्यात दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात 3000 पेक्षा जास्त दिव्यांग लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. दिव्यांग लाभार्थ्यांना दिव्यांग प्रमाणपत्र, घरकुल व इतर योजनांचा धनादेश, व्हील चेअर, गुरांच्या गोठ्यासाठी धनादेश, एम.एस.सी.आय. टी साठी एम.आय.एस किट या वैयक्तिक लाभांच्या योजनांचा लाभ देण्यात आला.
दिव्यांग बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून सातत्याने प्रशासनाशी पाठपुरावा करीत राहिल्याने बऱ्याच गोष्टी दिव्यांग बांधवांच्या पदरात पडून घेता आल्या. अजूनही बरेच प्रश्न सोडवायचे आहेत. दिव्यांग बांधवाना आपले प्रशासकीय स्तरावरील लाभ एकाच छताखाली मिळावेत, त्यांना इकडेतिकडे फिरावे लागू नये म्हणून त्यांच्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन बांधण्यात येईल अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे आ. बच्चू कडू यांनी धुळ्यात पत्रकार भवन येथे बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. दिव्यांग बांधवाना हक्काचे निवासस्थान असावे म्हणून दिव्यांगांसाठी घरकुल योजनेचा प्रस्तावही शासनाकडे सादर केला आहे असेही आ. कडू यांनी नमूद केले.
आ. बच्चू कडू हे पक्ष-संघटनात्मक अभियानाअंतर्गत बुधवारी धुळ्यात आले होते. आपल्या नियोजित कार्यक्रमानंतर आ. कडू यांनी पत्रकार भवन येथे दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. पहिले दिव्यांग मंत्रालय, अनाथांना एक टक्का आरक्षण असे अनेक कामे केल्याची माहिती देत काम सातत्याने सुरु असल्याचे आ. कडू यांनी सांगितले. ऑनलाईन गेमिंगवर राज्यासह संपूर्ण देशात बंदी घातली पाहिजे. देशानेच यावर निर्णय घेण्याची गरज आहे. ऑनलाईन गेमिंगचा प्रचार भारतरत्न सचिन तेंडुलकर करतील तर त्याविरोधात ठिकठिकाणी तेंडुलकर नावाची भिकपेटी ठेवून निषेध नोंदविला जाईल असा इशारा आ. कडू यांनी यावेळी बोलताना दिला. मराठा आरक्षणाच्या मुद्य्यांवर बोलताना आ. कडू म्हणाले की, मराठा ही जात नसून ते एका मुलुखाचे नाव आहे. मराठा म्हणजेच कुणबी व कुणबी म्हणजेच मराठा होय. विदर्भ, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र इत्यादी भागातील मराठा आरक्षणास पात्र आहे. मग मराठवाड्यातील मराठा अपात्र का करावा? असाही मुद्दा आ. कडू यांनी उपस्थित केला. या पत्रकार परिषदेला मंचावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंत बोरसे, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मिलिंद बैसाणे, विद्यमान अध्यक्ष विशाल ठाकूर, उपाध्यक्ष मनोज गर्दे, सचिव सचिन बागुल उपस्थित होते.
आ. बच्चू कडू यांचे पत्रकार भवनात आगमन होत असतानाच पाऊस सुरु झाला. महिनाभर दडी मारलेला पाऊस धो-धो बरसू लागल्याने ‘आ. कडूंचा पायगुण चांगला आहे’ अशी मिश्किल चर्चा पत्रकार बांधवांमध्ये रंगली. पाऊस घेऊन आलात म्हणत काही पत्रकारांनी चक्क आभार मानल्याने आ. कडू यांनीही हसत मनमुराद दाद दिली. आ. कडू पत्रकार परिषद आटोपून नंदुरबारकडे रवाना झाले. त्यानंतर सुमारे दोन तास पाऊस सुरु होता.
मिशन संवेदना’ उपक्रम
‘मिशन संवेदना’ उपक्रमांतर्गत दिव्यांगाना मुख्य प्रवाहात आणून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन ‘दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी अभियान’चे अध्यक्ष आणि मुख्य मार्गदर्शक, मंत्री दर्जा आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले.
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पाटील, महापौर प्रतिभा चौधरी, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, महापालिका आयुक्त सुनिता दगडे-पाटील, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, महापालिका उपायुक्त विजय सनेर, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक उपायुक्त योगेश पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, समाज कल्याण सभापती कैलास पावरा, महिला व बाल कल्याण सभापती संजीवणी सिसोदे, माजी सभापती अरविंद जाधव, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनिष पवार, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मोहन देसले, (प्राथमिक) राकेश साळुंखे, दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियानाचे क्रिष्णा शिरसाठ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्य मार्गदर्शक कडू म्हणाले, ‘मिशन संवेदना’उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हाभरातील प्रत्येक गावातील दिव्यांगांचे येत्या तीन महिन्यात सर्वेक्षण होणार आहे. दिव्यांगांचे हे सर्वेक्षण चांगल्या प्रकारे होईल याची दक्षता घ्यावी. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तिंना 11 प्रकारच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. दिव्यांगांना शारीरिक मर्यादा असूनही त्यांच्यात प्रचंड आत्मविश्वास असतो. त्यांना साथ दिल्यास ते भव्यदिव्य यश संपादन करू शकतील यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. दिव्यांग बांधवांसाठी 82 शासन निर्णय निर्गमित करण्यात आले असून दिव्यांगांसाठी 5 टक्के निधी खर्च करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे त्यांनी सांगितले. दिव्यांगांच्या हितासाठी निर्माण झालेले दिव्यांग मंत्रालय हे जगातील व देशातील पहिले दिव्यांग मंत्रालय आपल्या राज्यात राज्य शासनाने स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी राज्य शासनाचे आभार मानले.
‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ उपक्रमांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात जावून दिव्यांगाचे प्रश्न जाणून घेत असून येत्या काळात दिव्यांगासाठी घरकुल योजना राबविण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. दिव्यांगांच्या अनेक समस्या आहेत, त्या दूर करण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रित येण्याची गरज असून दिव्यांगांच्या तक्रारी दूर होण्यासाठी महिन्यातून केवळ एक दिवस दिव्यांग बांधवांसाठी दिल्यास त्यांच्या समस्या दूर करता येतील यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी गोयल म्हणाले की, जिल्हास्तरावरील शासनाच्या सर्व विभागाच्या शासकीय यंत्रणा एकाच ठिकाणी उपस्थित राहून दिव्यांगाच्या तक्रारी जाणून घेऊन त्यांना त्याचठिकाणी जलदगतीने लाभ देण्यासाठी दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी हे अभियान शासनामार्फत राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांत 5 हजार 300 लाभार्थ्यांना लाभ वितरीत करण्यात येणार असून येथे येणाऱ्या दिव्यांगांचे विविध योजनेचे अर्ज भरुन घेण्यात येणार आहे. दिव्यांगांचा सर्वागीण विकास होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात आजपासून मिशन संवेदना हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून नाविण्यपूर्ण दहा सुत्री कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता म्हणाले की, धुळे जिल्ह्यातील दिव्यांगांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या संकल्पनेतुन ‘मिशन संवेदना’ हा नाविन्यपुर्ण दहा सुत्री कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी आशा वर्कर मार्फत जिल्ह्यात दिव्यांगांचे सर्वेक्षण करण्यात येणार असुन पात्र दिव्यांगांना युडीआयडी (वैश्विक ओळखपत्र) वितरित केले जाणार असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महापौर प्रतिभाताई चौधरी तसेच माजी सभापती अरविंद जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मिशन संवेदना उपक्रमाचे तसेच दिव्यांग लोगोचे अनावरण करण्यात आले.