विवाहितेची आत्महत्या नव्हे, खून!
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील देगाव येथे विवाहितेने आत्महत्या केली नसून तिचा खून झाला आहे असा आरोप करीत पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी विवाहितेच्या नातेवाईकांनी केली आहे.
नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्यातील काकडदे येथील रहिवासी बालू दगा सोनवणे यांची मुलगी पूजा हिचा विवाह शिंदखेडा तालुक्यातील देगाव येथील दीपक जगदाळे यांच्याशी झाला होता. पूजा दीपक जगदाळे या विवाहितेने 5 सप्टेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती तिच्या नातेवाईकांना देण्यात आली. परंतु पूजाने आत्महत्या केली नसून तिचा खून झाला आहे असा आरोप तिच्या आई-वडिलांसह बहिणीने केला आहे.
याबाबत बुधवारी दुपारी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, पूजा दीपक जगदाळे ही रक्षाबंधन सणानिमित्त काकडदे येथे माहेरी आली होती. रक्षाबंधन झाल्यानंतर ४ सप्टेंबर रोजी तिचा पती दीपक जगदाळे हा तिला घेण्यासाठी काकडदे येथे आला. दुपारी ४ वाजता ते देगाव येथून पूजाला त्यांच्या गावी घेऊन गेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ५ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजता दीपक जगदाळेची वहिनी आरती सुनील कोळी यांनी फोनद्वारे कळविले की, पूजाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. दरम्यान, दीपक जगदाळे यांने सरपंच, पोलीस पाटील किंवा पोलिसांना न कळविता पूजाचा मृतदेह फाशी लावलेल्या अवस्थेत परस्पर दोंडाईचा रुग्णालयात दाखल केला.
फोन आल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी दोंडाईचा रुग्णालय गाठले. पुजाला तिचा पती दीपकने मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाला व त्यानेच तिला फासावर लटकविले, असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला. त्यामुळे राग आल्याने दीपक जगदाळे यांनी पूजाच्या आई-वडिलांनाही मारहाण केली. त्यानंतर ते शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे गेले असता पोलीस निरीक्षकांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. शिवविच्छेदन अहवाल आल्यावरच गुन्हा दाखल करू, असे सांगण्यात आले.
पती दीपक सोमा जगदाळे, सासरा सोमा गुलाब जगदाळे, सासू लता सोमा जगदाळे, भावजायी आरती सुनील कोळी यांनी तिचा खून करून तिला फासावर लटकविले, असा आम्हाला संशय आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध भादंवि कलम 302 अन्वये तसेच महिला अत्याचार कायद्यान्वये गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
निवेदन देताना पूजाचे वडील बाळू दगा सोनवणे, आई कल्पनाबाई सोनवणे, बहीण प्रतिभा सोनवणे, ज्ञानेश्वर कोळी, आनंद कोळी, संदीप सोनवणे, शांताराम जगताप, धनराज जगताप, पुनमचंद बोरसे, दत्तू सोलंकी, सुनील कुवर, तसेच ऑल इंडिया पॅंथर सेनेचे सागर मोहिते, माया पानपाटील, अनिता सोनवणे, आनंद अमृतसागर, भाऊसाहेब बैसाणे, अमर सोनवणे, ॲड. सागर झाल्टे आदी उपस्थित होते.