आरक्षणासाठी मराठा समाजाचा रस्तारोको, तर ओबीसी कोट्यातून तीव्र विरोध
धुळे : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजातर्फे शुक्रवारी धुळे शहरालगत मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने झाली. मराठा आंदोलनामुळे महामार्गाची वाहतूक तासभर ठप्प झाली होती. दरम्यान, ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसी संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला असून, ओबीसी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी केली.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरू असलेला लढा आता अधिक तीव्र झाला आहे. धुळ्यातही मराठा समाज आज महामार्गावर रस्ता रोको करीत आक्रमक झाला. चाळीसगाव चौफुलीवर भर पावसात मराठा समाजाच्या असंख्य महिला, पुरुषांनी रस्त्यावर ठिय्या देत महामार्ग रोखून धरला. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. प्रचंड घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले. मराठा समाजाचे आरक्षण देण्यासंदर्भात होत असलेल्या विलंबनामुळे राज्यभरात मराठा समाजातून रोष व्यक्त होत आहे. जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे उपोषण सुरू आहे. धुळ्यातही त्या आंदोलनाला पाठिंबा देत मराठा समाजाच्या तरुणांनी साखळी उपोषण सुरू केले आहे.
आज मराठा समाजाने मुंबई-आग्रा महामार्ग आणि धुळे -सोलापूर महामार्ग असलेल्या चाळीसगाव चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले. भर पावसात आंदोलक हातात भगवे झेंडे घेवून घोषणाबाजी करत उतरल्याने वाहतूक ठप्प झाली. या आंदोलनाला विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही पाठिंबा दिला. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले. या आंदोलनामुळे सुमारे तासभर मुंबई-आग्रा महामार्गावरील दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली होती. वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या. अखेर पोलिसांनी कारवाई करीत आंदोलकांना ताब्यात घेत प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
सरकारने मराठा समाजाला सरसकट आरक्षण जाहीर करावे. जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठी हल्ला करणाऱ्या पोलिसांना कठोर कारवाई आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
आंदोलनात भानुदास बगदे, नानासाहेब कदम, निंबा मराठे, अतुल सोनवणे, प्रदीप जाधव, विनोद जगताप, राजेंद्र इंगळे, राजू ढवळे, विकास बाबर, कैलास मराठे, जितू ईखे, अशोक सुडके, नैनेश साळुंखे, वाल्मीक मराठे, बबलू पाटील, भोला वाघ, प्रकाश चव्हाण, भैय्या शिंदे, साहेबराव देसाई, हनुमंत अवताडे, विक्रमसिंग काळे, जगन ताकटे, मनोज ढवळे, संजय गायकवाड, सचिन मराठे, शुभांगी पाटील आदी उपस्थित होते .
ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध
दरम्यान, मराठा समाजाला ओबीसी संवर्गात सामावून घेऊ नये, तसेच कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी करीत विविध ओबीसी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. अखिल भारतीय समता परिषद, महात्मा फुले विचार मंच, खानदेश माळी महासंघ, लोक क्रांती सेना यासह ओबीसी संघटनांनी ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. यावेळी राजेश बागुल, बी. एन. बिरारी, माजी नगरसेवक दिलीप देवरे, प्राचार्य एस. टी. चौधरी, प्राचार्य बी. बी. महाजन, डॉ. सुनील वाघ, व्ही. एस. जाधव, डॉ. विशाल जाधव, ज्ञानेश्वर माळी, अनिलकुमार बोरसे, चैत्राम भदाणे, मुरलीधर रोकडे आदी उपस्थित होते.
हेही वाचा