मान गये मुस्लिम भाईयो, गणपती विसर्जनासाठी स्वतःचा सण दोन दिवस पुढे ढकलला
धुळे : अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद हे उत्सव एकाच दिवशी येत आहे. या पार्श्वभूमीवर ईद-ए-मिलाद ची मिरवणूक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इतर ठिकाणी 29 सप्टेंबर, तर धुळे शहरात 30 सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेऊन मुस्लिम बांधवांनी सामाजिक एकात्मता जोपासण्याचा संदेश दिला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ईद-ए-मिलादच्या मिरवणूकीच्या संदर्भात आढावा बैठक जिल्हा नियोजन सभागृह येथे संपन्न झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावर्षी गुरुवार, 28 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी तसेच ईद-ए-मिलाद हे सण एकाच दिवशी येत असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी अनंत चतुर्थीच्या दिवशीऐवजी ईद-ए-मिलादची मिरवणूक एक किंवा दोन दिवसांनी काढण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्यावतीने सिरत कमिटी सदस्य तसेच बैठकीस उपस्थित मुस्लीम बांधवांना करण्यात आली. याबाबत उपस्थित मुस्लीम बांधवांनी प्रशासनाशी चर्चा करुन चर्चेअंती धुळे शहरातील ईद- ए- मिलादची मिरवणुक शनिवार 30 सप्टेंबर रोजी काढण्यात येईल. व त्याव्यतिरीक्त जिल्ह्यातील इतर ठिकाणी निघणाऱ्या मिरवणुका शुक्रवार 29 सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
तसेच मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मिरवणुकांमध्ये मोठ्या काठयांचे झेंडे फिरविले जाणार नाही, काही अक्षेपार्ह घोषणाबाजी अगर हावभाव, आरडाओरड करण्यात येणार नाही. याबाबत काळजी घेवून येणारे सण, उत्सव शांततेने साजरे करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधिक्षक संजय बारकुंड यांनी यावेळी केले आहे.
या बैठकीस सर्व तहसिलदार, मुख्याधिकारी तसेच पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्ह्यातील सिरत कमिटीचे सदस्य, मुस्लिम धर्मगुरु, मौलाना, मुस्लिम समाजाचे प्रतिष्ठीत नागरीक, नगरसेवक, माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
हेही वाचा