गावठी बंदुकीने दहशत माजविणाऱ्या तरूणाला एलसीबीने पकडले
धुळे : अवैधरित्या पिस्तूल बाळगणाऱ्या एका तरूणाला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल तसेच मॅकझिन व काडतूस जप्त केले आहे.
याबाबत पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, करणं छगन शिंदे (वय ४०, रा. निजामपूर ता. साक्री) हा दहशत पसरविण्याच्या उद्देशाने अवैध गावठी पिस्तूल बाळगून असल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला आदेश दिले.
या पथकाने करण जगन शिंदे याचा शोध घेतला असता तो निजामपूर बसस्थानक परिसरात आढळून आला. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या खिशात गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस आढळून आले. ४० हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे स्टील बॉडी व मॅकझिन असलेले व त्याला काळया रंगाची मुठ असलेले पिस्तूल तसेच एक हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, योगेश राऊत, मच्छिंद्र पाटील, निलेश पोतदार, सुशील शेंडे, गुणवंतराव पाटील यांच्यासह पथकाने केली.