अडीच लाख शेतकऱ्यांना पीक विम्याची 25 टक्के अग्रीम रक्कम रोख मिळणार!
धुळे : जिल्ह्यात कमी पर्जन्यमानामुळे १२ मंडळांपैकी दहा मंडळांमध्ये मीड सीझन (मध्य हंगाम) म्हणून नोंद झाली आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख पीक विमाधारक शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम भरपाई रक्कम रोख स्वरूपात देण्यात येणार आहे. सदरची भरपाई रक्कम संबंधितांना तातडीने वितरित करण्याच्या सक्त सूचना खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी मंगळवारी दिल्या.
संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई व उपाययोजनांसंदर्भात खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सकाळी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक तसेच विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, महिला बालकल्याण सभापती संजीवनी सिसोदे, माजी कृषी सभापती प्रा. श अरविंद जाधव, माजी कृषी सभापती संग्राम पाटील, जि. प. सदस्य राम भदाणे, शालिनी भदाणे, आशुतोष पाटील आदी उपस्थित होते.
याप्रसंगी धुळे तालुक्यातील 34 गावांमध्ये अल्प पर्जन्यमान विचारात घेता टँकरने पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे. या गावातील सरपंच आणि ग्रामसेवक यांनी यावेळी गावाबद्दलची सद्यस्थिती सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच विविध जलाशयांमध्ये असलेल्या शिल्लक पाणी साठ्याबाबत देखील यावेळी माहिती देण्यात आली. ही बाब ऐकल्यानंतर संबंधित गावांमध्ये आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
जिल्ह्यावरील दुष्काळाचे सावट लक्षात घेता येणाऱ्या काळात पिण्याचे पाणी, गुरांसाठी पाणी, चाऱ्याचे नियोजन याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करण्याचे आदेश खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिले. पशुधनासाठी संभाव्य चारा टंचाई लक्षात घेता शेतकऱ्यांनी वैरण पिके पेरावीत. त्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत मोफत बियाणे देण्यात येतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
यंदाच्या हंगामात पेरणीनंतर लांबलेला पाऊस आणि जिल्ह्यावरील दुष्काळाचे सावट लक्षात घेता बारा मंडळापैकी दहा मंडळांमध्ये मीड सीजन (मध्य हंगाम) म्हणून नोंद झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 2 लक्ष 51 हजार पीक विमाधारक शेतकऱ्यांना 25 टक्के भरपाई रक्कम रोख स्वरूपात देण्यात येणार आहे. सदरची भरपाई रक्कम संबंधितांना तातडीने वितरित करण्याच्या सक्त सूचना खासदारांनी यावेळी दिल्या.
यावेळी सरपंच आणि ग्रामसेवकांच्या भावना ऐकून घेतल्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पाटील म्हणाल्या की, अल्प पर्जन्यमान झाल्यामुळे यंदाचा हंगाम धोक्यात आहे. दुष्काळाचे सावट लक्षात घेता सरपंच, ग्रामसेवक यांची जबाबदारी वाढलेली आहे. त्यांनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भूमिकेतून या प्रश्नाला तोंड देण्याची गरज आहे. संभाव्य टंचाई लक्षात घेता कुणीही आपल्या कर्तव्यात कसूर करू नये. या संकटाला तोंड देण्यासाठी आपण सर्व सांघिक प्रयत्नातून सज्ज राहूया. पदाधिकारी म्हणून आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत, अशी ग्वाही देत अश्विनी पाटील यांनी सरपंच आणि ग्रामसेवक यांचे मनोबल वाढविले.
जल जीवन मिशनच्या गावांना ट्रान्सफाॅर्मर
जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा योजनेसाठी विद्युत जोडणी आवश्यक असलेल्या आठ गावांना ट्रान्सफाॅर्मर बसविण्यात आले आहेत. मात्र अद्यापही 20 गावे अशी आहेत की जेथे विद्युत ट्रान्सफाॅर्मर तातडीने बसविणे आवश्यक आहे. ही बाब सभागृहाच्या लक्षात आणून दिल्यानंतर खासदार डॉ. भामरे यांनी सदरचा प्रश्न झ यावेळी दिली.
या बैठकीस गटविकास अधिकारी प्रदीप पवार, तहसीलदार शेवाळे, पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता जयश्री सारवे यांच्यासह कृषी, पशुसंवर्धन, वीज वितरण कंपनी, पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.