आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे गर्भवती महिलेच्या पोटातच बाळाचा मृत्यू
धुळे : साक्री तालुक्यातील कासारे येथे आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे गर्भवती महिलेच्या पोटातच बाळाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. याबाबत कासारे गटाचे जिल्हा परिषद सदस्य गोकुळसिंह परदेशी यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहात आवाज उठवून या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.
धुळे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा जिल्हा परिषद अध्यक्षा अश्विनी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती संजीवनी सिसोदे, समाज कल्याण सभापती कैलास पावरा, कृषी सभापती हर्षवर्धन दहिते, आरोग्य सभापती महावीरसिंह रावल, मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक बाळासाहेब बोटे व्यासपीठावर उपस्थित होते.
आरोग्य यंत्रणेचे काढले वाभाडे
जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कर्मचारी हजर नसतात औषधे मिळत नाहीत मिळाली तर ती मुदतबाह्य झालेली असतात अशा असंख्य तक्रारी सदस्यांनी करून आरोग्य यंत्रणेचे वाभाडे काढले.
बोरकुंड आरोग्य केंद्राचाही प्रश्न सभागृहात गाजला. या आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी कधीच थांबत नाहीत. रुग्णांचा केस पेपर काढला जात नाही. औषधेही मिळत नाहीत. तसेच आरोग्य केंद्रात स्वच्छता देखील नाही, असे आरोप सदस्यांनी केले. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्निल बोडके यांनी बोरकुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला असता सर्व अधिकारी, कर्मचारी कागदावरच आहेत. मात्र काम कोणीच करीत नसल्याचे सदस्यांनी सांगितले.
तसेच कुडाशी आरोग्य केंद्रात औषधनिर्माण अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. जिल्हा परिषद प्रत्येक आरोग्य केंद्राला औषधे खरेदीसाठी तीन लाख रुपये देते. मात्र या आरोग्य केंद्रात मुदत संपलेली औषधे दिली जातात, असाही आरोप सदस्यांनी केला.
तसेच कासारे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एक महिला तपासणीसाठी गेली असता तिला खाजगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. उपचारात दुर्लक्ष झाले. त्यामुळे गर्भवती महिलेच्या पोटातील बाळ दगावले, अशी तक्रार कासारे गटाचे सदस्य गोकुळ सिंह परदेशी यांनी केली.
सोलर पॅनलचा विषय चर्चेला आला असताना सदस्य राम भदाणे म्हणाले की, आरोग्य केंद्रामध्येही सोलर पॅनल बसविण्यात आले. मात्र एकही ठिकाणी हे सोलर पॅनल काम करीत नाही. संबंधित ठेकेदाराने त्याचे बिल काढून घेतले असून, त्या ठेकेदाराची अनामत रक्कम जिल्हा परिषदेकडे आहे. ती जप्त करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनी आरोग्य यंत्रणेत लक्ष घातले जाईल, असे सांगितले.
सुरक्षारक्षक भरतीमध्ये गैरव्यवहार
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरक्षारक्षकांची झालेली भरती बेकायदेशीर असल्याचा आरोप संग्राम पाटील यांनी केला. तत्कालीन अधिकाऱ्यांनी सभागृहात दिशाभूल करणारी माहिती देऊन ही भरती केलेली आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा आपण न्यायालयात जाणार, असा इशारा त्यांनी दिला.
सभेच्या सुरुवातीलाच विरोधी पक्षनेते पोपटराव सोनवणे यांनी मागील सभेचे इतिवृत्त कायम करताना सदस्यांनी जे प्रश्न उपस्थित केले होते, त्या प्रश्नांबाबत काय कार्यवाही केली, याबाबत विचारणा केली. मात्र अधिकाऱ्यांकडून कोणतेही उत्तर मिळत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
तसेच यावर्षी कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला पीक विम्याचा लाभ मिळाला पाहिजे असा ठराव करण्यात आला. जिल्हा परिषदेचा एकही विभाग व्यवस्थित माहिती देत नसल्याने ललित भारुडे यांनी देखील नाराजी व्यक्त केली. अपंग युनिट मधील बोगस शिक्षकांवर गुन्हे दाखल करावेत असे पत्र एसआयटीने दिले आहे. मात्र 11 महिने झाले तरी कोणतीही कारवाई झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद सभागृहाला कुलूप ठोकणार!
दरम्यान, शिंदखेडा तालुक्यात शिक्षकांची रिक्त पदे, सिंचन विहिरींचा प्रश्न आणि पंचायत समितीमधील प्रभारी राज या मुद्यांवरून दमाने गटाच्या जिल्हा परिषद सदस्य सुनिता सोनवणे यांनी आक्रमक भूमिका घेतली. शिंदखेडा पंचायत समितीत सर्वच पदांवर प्रभारी अधिकारी कार्यरत आहेत. शिक्षकांची 129 पदे रिक्त आहेत. धुळे, शिरपूर आणि साक्री तालुक्यात एवढी रिक्त पदे नाहीत. शिंदखेडा तालुक्यावरच अन्याय का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
शिंदखेडा तालुक्यात भाजपाचे आठ सदस्य आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे. मात्र शिंदखेडा तालुक्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध कोणीही आवाज उठवायला तयार नाही. भविष्यात निवडणुका आहेत. मतदारांकडे कोणत्या तोंडाने मते मागायला जाल? असे सांगत त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. शिंदखेडा तालुक्यात कायमस्वरूपी अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, सिंचन विहिरी मंजूर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, आदी प्रमुख मागण्या त्यांनी केल्या. जिल्हा परिषद अध्यक्षा अश्विनी पाटील यांना उद्देशून बोलताना सुनिता सोनवणे म्हणाले की, “अध्यक्ष ताई तुम्ही देखील शिंदखेडा तालुक्याच्या आहात. त्यामुळे आपल्या तालुक्यावर दयामाया दाखवावी. अन्यथा या पुढची सभा होऊ देणार नाही. जिल्हा परिषदेच्या सभागृहाला कुलूप ठोकून आंदोलन करेल.”, असा इशारा सुनिता सोनवणे यांनी दिला.
हेही वाचा