मराठा समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सक्रिय ‘सारथी’, राज्यातील 1 लाख 33 हजार विद्यार्थ्यांनी घेतला लाभ
धुळे : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, अर्थात सारथीच्या माध्यमातून राज्यातील मराठा समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठी विविध कल्याणकारी उपक्रम, योजना व्यापक स्वरुपात राबवण्यात येत आहेत. त्यानुसार राज्यातील 1 लाख 33 हजार 236 विद्यार्थ्यांनी या संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेतला आहे.
यात पीएच.डी च्या अधिछात्रवृत्ती विभागातील 2 हजार 109 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण विभागात 25 हजार 107, शिक्षण विभागातंर्गतच्या योजनांचा 25 हजार 137 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. तसेच कौशल्य विकास प्रशिक्षण विभागांतर्गत 20 हजार 743 लाभार्थ्यांना तसेच सारथीच्या इतर उपक्रमातंर्गत 60 हजार 140 विद्यार्थ्यांना याचा फायदा झालेला आहे.
राज्यातील सर्व घटकांच्या विकासाला पूरक वातावरण, सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे. याच उद्देशाने महाराष्ट्रातील विविध जातसमूहांच्या अस्तित्वाची दखल घेऊन त्या अनुषंगिक सहाय्यक योजना, उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने विविध महामंडळांची, विभागांची निर्मिती राज्य शासनाचे केली आहे.. या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या, युवा पिढीच्या प्रगतीसाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे सारथीची स्थापना करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या नियोजन विभागांतर्गत स्वायत्त संस्था म्हणून छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, अर्थात सारथी कार्यरत आहे. शासनाकडून या संस्थेस भरीव निधी प्राप्त होत असून सन 2023-24 या आर्थिक वर्षात 300 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या संस्थेचे मुख्यालय पुणे येथे असून उपकेंद्र कोल्हापूर येथे कार्यरत आहे. त्यासोबतच सारथीचे राज्यात 8 विभागीय कार्यालय आहेत. त्यात कोल्हापूर, खारघर, नवी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती व नागपूर या ठिकाणी कार्यरत आहेत. ही संस्था राज्य शासनाच्या नियोजन विभागाच्या अधिपत्याखाली कंपनी कायदा -2013 च्या कलम 8 अन्वये नोंदणीकृत असून संस्थेमार्फत मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या प्रवर्गाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी विविध कल्याणकारी योजनांची कालबध्द तऱ्हेने व प्रभावीपणे अंमलबाजावणी करते. सारथीच्या संचालक मंडळावर शासनाने बारा संचालकांची नियुक्ती केलेली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून संस्थेचे कामकाजावर नियंत्रण ठेवण्यात येते.
सारथी मार्फत राबविण्यात येत असलेल्या शैक्षणिक योजना
महाराणी ताराराणी स्पर्धा परीक्षा : महाराणी ताराराणी स्पर्धा परीक्षा ही सारथी मार्फत युपीएससी, एमपीएससी स्पर्धा परिक्षांच्या पूर्व, मुख्य तसेच मुलाखत या तीन्ही टप्प्यांवर विद्यार्थ्यांना तयारीसाठी प्रशिक्षण सहाय्य करते. यासाठी महाराणी ताराराणी स्पर्धा परिक्षा विभाग सक्रियरित्या कृतीशील असून या उपक्रमांतर्गत युपीएससीच्या पूर्व परिक्षेसाठी पाचशे विद्यार्थी दरवर्षी निवडण्यात येतात. नवी दिल्ली येथील प्रशिक्षणासाठी विद्यार्थांना दरमहा 13 हजार व पुणे येथील विद्यार्थ्यांना दरमहा 9 हजार रु.विद्यावेतन दिले जाते. तसेच प्रशिक्षण संस्थेचे शुल्क सारथीमार्फत भरण्यात येते.
आत्तापर्यंत गत तीन वर्षांत 1 हजार 479 विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेसाठी 21 कोटींचा लाभ डीबीटीच्या द्वारे देण्यात आला आहे. युपीएससी मुख्य परिक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये एकरकमी दिले जातात. सारथी मुख्यालयातून विद्यार्थ्यांच्या अडी- अडचणी, समस्या सोडविण्यासाठी झूम मिटींगद्वारे मार्गदर्शन ही करण्यात येते. आत्तापर्यंत मागील तीन वर्षांत साडेसहाशे विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी 3.25 कोटीचा लाभ डीबीटीद्वारे देण्यात आला आहे. तर मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना 25 हजार रुपये एकरकमी देण्यात येते. मागील तीन वर्षात 206 विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी रुपये 51 लाखाचा लाभ डीबीटीद्वारे देण्यात आला आहे.
युपीएससी परिक्षांमध्ये सारथीच्या माध्यमातून विद्यार्थी उत्तम यश प्राप्त करत असून आयएएस सेवेत तीन वर्षात बारा, आयपीएस मध्ये 18 तर आयआरएस सेवेत आठ आणि इतर केंद्रीय सेवांमध्ये एकुण बारा अशा सारथीमधील 51 विद्यार्थ्यांची युपीएससी परीक्षेत निवड झालेली आहे. तर भारतीय वन सेवेसाठी सारथी संस्थेतील दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. तसेच युपीएससी सीएपीएफ सेवेसाठी संस्थेतील पाच विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
राज्य सेवा प्रशिक्षण मार्गदर्शन : युपीएससी प्रमाणेच राज्य सेवा परिक्षा अर्थात एमपीएससीमध्ये ही सारथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, कोचींग सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. एमपीएससीसाठी साडे सातशे विद्यार्थ्यांची निवड दरवर्षी करण्यात येते. यासाठी पुणे येथील विद्यार्थ्यांना दरमहा आठ हजार विद्यावेतन दिले जाते. प्रशिक्षण संस्थेचे शुल्क सारथी मार्फत भरण्यात येते. आत्तापर्यंत मागील तीनवर्षांत 1125 विद्यार्थ्यांना पूर्व परिक्षेसाठी 8.26 कोटीचा लाभ डीबीटीद्वारे वितरीत करण्यात आला आहे. मुख्य परिक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना 15 हजार एक रकमी दिले जातात. आत्तापर्यंत मागील तीन वर्षात 7 हजार 367 विद्यार्थ्यांना मुख्य परिक्षेसाठी 11 कोटी रुपयांचा लाभ डीबीटीद्वारे देण्यात आला आहे. तसेच मुख्य परिक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना 10 हजार रु.एकरकमी दिले जातात. त्यासोबतच विद्यार्थ्यांना सारथीच्या मुख्यालयातून झूम मिटींगद्वारे तसेच अभिरुप मुलाखतीद्वारे मार्गदर्शन केले जाते.
गत तीन वर्षांत 566 विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी 56.60 लाखाचा लाभ डीबीटीद्वारे देण्यात आला आहे. सारथीच्या मार्गदर्शनातून सन 2021-2022, 2022-23 या वर्षात वर्ग एक श्रेणीमध्ये 74 तर वर्ग दोन श्रेणीत 230 अशा एकूण 304 विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहेत.
अधिक माहितीसाठी https://sarthi-maharashtragov. in/ या संकेतस्थळावर तसेच सारथी विभागीय कार्यालय, बँरेक नंबर 8, विभागीय आयुक्त कार्यालय आवार, नाशिकरोड, नाशिक येथे संपर्क साधावा.
संकलन
जिल्हा माहिती कार्यालय,धुळे