स्टोन क्रेशरच्या रखवालदाराला गौण खनिज चोरांकडून मारहाण
धुळे : खाजगी रस्त्यावरून ट्रॅक्टर जाऊ देण्यास विरोध केला म्हणून एका स्टोन क्रेशरच्या रखवालदारासह त्याच्या वयोवृद्ध वडिलांना गौण खनिज चोरांनी मारहाण केल्याची घटना शिंदखेडा तालुक्यातील चांदगड गावात 13 सप्टेंबर रोजी रात्री घडली.
चांदगड येथे एका स्टोन क्रेशरवर अमृत ईशी हे रखवालदार म्हणून काम करतात. स्टोन क्रेशरच्या आवारातून एक खाजगी रस्ता जातो. या रस्त्यावरून गौण खनिजाची अवजड वाहने जाऊ देऊ नये, असे स्टोन क्रेशरच्या मालकाने रखवालदाराला बजावले होते. त्यानुसार 13 सप्टेंबर रोजी रात्री नाना शिरसाठ हा व्यक्ती खडी आणि दगड भरलेले ट्रॅक्टर खाजगी रस्त्यावरून नेत असताना अमृत ईशी आणि त्यांचे वडील भिला ईशी यांनी ते ट्रॅक्टर अडविले. “हा खाजगी रस्ता आहे. स्टोन क्रेशरच्या मालकांनी या रस्त्यावरून ट्रॅक्टर जाऊ देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे तुम्ही या रस्त्यावरून ट्रॅक्टर येऊ नका.” असे सांगितल्याचा राग आल्याने नाना शिरसाठ, अजय शिरसाठ आणि सतीलाल शिरसाठ या तिघांनी अमृत ईशी व त्यांचे वडील भिला ईशी यांना मारहाण करीत शिवीगाळ आणि दमदाटी केली. या प्रकरणी 14 सप्टेंबर रोजी शिंदखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
गावठाणमधून गौण खनिजाची चोरी
याविषयी भिला ईशी, अमृत ईशी आणि शामराव ईशी यांनी सांगितले की, चांदगड गावात गावठाणमध्ये असलेल्या टेकड्यांमधून गेल्या अनेक महिन्यांपासून गौण खनिजाची चोरी सुरू आहे. गावालगतच्या टेकड्या पोखरून दगड, खडी आणि मुरूम काढला जात आहे. ग्रामपंचायतीला कोणत्याही प्रकारची रॉयल्टी दिली जात नाही.
गौण खनिजाने भरलेले ट्रॅक्टर रात्रीच्या वेळी खाजगी रस्त्यांवरून तसेच शेतशिवारांमधून जातात. त्यामुळे पिकांचे नुकसान होऊ शकते. खाजगी रस्त्यांवरून आणि शेतांच्या परिसरातून ट्रॅक्टर येऊ नये यासाठी वेळोवेळी विरोध केला आहे. परंतु गौण खनिज चोरांची मजोरी वाढली असून, ते काहीही ऐकायला तयार नाहीत. जास्त विरोध केला तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली जाते. गौण खनिज चोरांच्या या दहशतीमुळे गावातील काही शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे.