मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कार्यक्रमात नेमका काय राडा झाला? Video पहा
धुळे : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत दोंडाईचा रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमात शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलाच राडा घातला. निवेदन देण्यासाठी गेलेल्या पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटने प्रकरणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. काही तासानंतर त्यांची सुटका करण्यात आली. उधना ते भुसावळ मेमू रेल्वे गाडीला हिरवी झेंडी दाखविण्यासाठी रावसाहेब दानवे शुक्रवारी रात्री दोंडाईचा रेल्वे स्थानकावर आले होते.
दोंडाईचा येथील दाऊळ रस्त्यावर उड्डाणपूल अथवा भुयारी मार्ग करून रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, यासह विविध मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी दोंडाईचा रेल्वेस्थानकावर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र निवेदन देण्यासाठी आलेल्या पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की झाल्याने मंत्री दानवे यांच्या समोरच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करीत राडा केला. यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करीत शानाभाऊ सोनवणे यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले होते.
दोंडाईचा शहरातील दाऊळ रस्त्यावरील रेल्वे गेट पंधरा ते वीस मिनिटांनी बंद होत असते. या रेल्वे गेट मार्गाने दाऊळ, मंदाणे, झोतवाडे, शेंदवाडे, साहूर तावखेडा व सिंधी कॉलनीसह जुने शहादा रोडवरील रहिवासी व शालेय विद्यार्थी प्रवास करीत असतात. परंतु रेल्वेच्या फेऱ्या अधिक असल्याने सतत गेट बंद होते. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यासाठी दाऊळ रस्त्यावर उड्डाणपूल उभारावा अथवा भुयारी मार्ग करावा. तसेच नंदुरबार, दोंडाईचा, अंमळनेर, जळगावकडून चाळीसगावमार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स रेल्वे सुरू करावी, एक रेल्वे गाडी जळगाव, चाळीसगावमार्गे सुरू करावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे व कार्यकर्ते दोंडाईचा रेल्वे स्थानकावर ठाण मांडून बसले होते. त्या ठिकाणी मंत्री दानवे आल्यानंतर त्यांना निवेदन देण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते पुढे आले. मात्र या पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की झाल्यानंतर शिवसैनिकांनी घोषणाबाजी केल्याने परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करीत शानाभाऊ सोनवणे यांच्यासह जिल्हा उप संघटक कल्याण बागल, उप तालुकाप्रमुख शैलेश सोनार, उपशहर प्रमुख आबा चित्ते, मनोज परदेशी, राज ढोले, किरण सावळे यांना ताब्यात घेतले. काही तासानंतर रात्री उशिरा त्यांची सुटका करण्यात आली.
हेही वाचा