धनगर समाजाने एसटी आरक्षणासाठी दिला दोन दिवसांचा अल्टीमेटम
धुळे : राज्यघटनेतील तरतुदीप्रमाणे अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी राज्य सरकारला दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा धनगर समाजाच्या विविध संघटनांनी सोमवारी धुळ्यात दिला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या मध्यप्रदेशातील चोंडी येथे धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन आश्वासन दिले होते. परंतु कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे धनगर समाज राज्यव्यापी आंदोलन उभारणार असल्याची माहिती धनगर समाज महासंघाचे प्रदेश सरचिटणीस सुनील वाघ यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशाच्या राज्यघटनेत महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा दिला आहे. परंतु गेली ७० वर्षे आरक्षणाची अंमलबजावणी होत नसल्याने धनगर समाजावर अन्याय होत असल्याची समाजाची भावना झाली आहे. अनेक वर्षे यासाठी धनगर समाज शांततेच्या मार्गाने आंदोलने करीत आहे. एस. टी. आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची सनदशीर मागणी करत आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारला शिफारस करून व केंद्र सरकारने घटनेतील तरतुदीचे पालन करून महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी आहे.
राज्य सरकारने केंद्र सरकारला तातडीने पत्र देवून दि. १८ सप्टेंबरपासुन सुरु होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात वटहुकूम काढून आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अशी प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी ६ सप्टेंबरपासुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ चोंडी ता. जामखेड येथे धनगर समाज कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. त्या आंदोलनास धुळे जिल्ह्यातील सकल धनगर समाजाचा पाठींबा आहे. याबाबत राज्य सरकारने तातडीने पाऊले उचलून मागणी मान्य करावी. अन्यथा भविष्यात या मागणीसाठी धुळे जिल्ह्यात कायदेशीर व सनदशीर मार्गाने तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी राज्य शासनाची राहिल, असा इशारा दिला आहे.
यावेळी महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेश सरचिटणीस सुनिल वाघ, भगवान गर्दे, सागर पाकळे, प्रा. विजय पाटील, चुडामण पाटील, गणेश गर्दे, नंदू बागले, मनोज कोळेकर, अण्णासाहेब खेमनार, प्रा. डॉ. संदीप खताळ, चुडामन पाटील, युवराज हटकर, लखन गोराड, मुकुंद अहिरे, शांताराम पाटील, रतिलाल पाटील, सुकदेव धनगर, रवींद्र धनगर, अमोल मासुळे, राज सरग, ज्ञानेश्वर मासुळे, एकनाथ पाटील, गोरख पाटील, कमलाकर गर्दे, सोमनाथ पाटील, मुकेश थोरात, मनोज सरगर, किरण भाऊ, रोहिदास हाके आदी उपस्थित होते.