मुस्लिम बांधवांच्या ढोल ताशाच्या गजरात गणरायाचे स्वागत
धुळे : ‘गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया’…च्या जयघोषात आज घराघरात गणपती बाप्पांचं आगमन झालं. तृतीयपंथीयांच्या काळुबाई मंदिरातही गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. विशेष म्हणजे बाप्पांच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या मुस्लिम बांधवांच्या ढोल ताशा पथकांच्या गजराने सामाजिक आणि धार्मिक सलोख्याचा संदेश दिला.
धुळे शहरातील क्युमाईन क्लब रस्ता, जिल्हा रुग्णालयाचा रस्ता आणि फुलवाला चौकात गणरायाच्या मूर्ती उपलब्ध होत्या. भाविकांनी सकाळपासूनच मूर्ती खरेदीसाठी गर्दी केली होती. सार्वजनिक मंडळ असो की घरगुती गणपती असो, बाप्पांचं आगमन वाजत गाजत होणार एवढं नक्की. त्यासाठी शहरातील रस्त्यांवर लहान-मोठी १०० पेक्षा अधिक ढोल ताशा पथके तैनात होती.
मुस्लिम बांधवांच्या ढोल ताशा पथकांनी वेधलं लक्ष : ढोल ताशा पथकांच्या गर्दीत मुस्लिम बांधवांची देखील जवळपास पंधरा ते वीस पथके विविध रस्त्यांवर होती आणि या पथकांनी भाविकांचं लक्ष वेधून घेतलं. सलमान मेहतर, मोहिम मेहतर, शोएब मेहतर, जाविद आणि नासिर मेहतर यांचे पथक महानगरपालिका चौकात होतं. मुस्लिम बांधवांच्या ढोल ताशाच्या गजरात झालेलं बाप्पांचं आगमन सामाजिक सलोख्याचा संदेश देणार ठरलं. यामागे पैसे कमावण्याचा उद्देश असला तरी, पोटाच्या भुकेपुढे जात आणि धर्माचं महत्व शून्य असल्याचं प्रकर्षान जाणवलं.
तृतीयपंथीयांकडेही बाप्पांच आगमन : धुळे शहरातील मालेगाव रोडवरील इच्छापूर्ती काळुबाई मंदिरातही तृतीयपंथीयांनी गणरायाची प्रतिष्ठापना केली फुलवाला चौकातून घेतलेली बाप्पांची मूर्ती वाजत गाजत नेताना तृतीयपंथीयांनी धरलेल्या ठेक्याने धुळेकरांचं लक्ष वेधून घेतलं. “पाऊस पाणी चांगला पडू दे आणि सर्वांच्या मुला-बाळांना सुखी ठेव”, असं साकडं तृतीयपंथीयांनी गणपती बाप्पाला घातलं.
गणरायाच्या स्वागताने धुळे महानगर दुमदुमले
आज सर्वत्र गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… आले रे..आले… गणपती आले… चा जयघोष ऐकायला मिळाला. ढोल ताशाच्या गजरात वाजत-गाजत घरोघरी गणपती बाप्पांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. शिवसेनेचे महानगर प्रमुख डॉ. सुशील महाजन, डॉ. निशा महाजन, दीपक माळी, आझाद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पोलीस मुक्तार मन्सुरी, जितेंद्र परदेशी, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस युवराज करनकाळ, प्रीतम करनकाळ, उद्योजक संजय अग्रवाल, सुहास अंपळकर, महेश बाविस्कर, संतोष बिरारी, कविता बिरारी, आर्यन बिरारी, गणेश लाडे, संजय पाटोळे, मानसी लाडे, विशाल यरडावकर, हरिभाऊ घोटाळे, पोलीस कर्मचारी प्रवीण पाटील, सशमंडळ अधिकारी सागर नेमाने, निलेश नेमाने, नेमाने परिवार, कॉन्ट्रॅक्टर प्रसाद जोशी परिवार, अग्रवाल परिवार, कैलास अग्रवाल, राजू अग्रवाल, हर्षल अग्रवाल, नाना अग्रवाल, सचिन अग्रवाल, मनोहर शर्मा, प्रीतम अग्रवाल यांच्यासह शहरातील असंख्य भाविकांनी गणेश मूर्तीची मिरवणूक काढून मंडळात तसेच घरोघरी स्थापना केली.
धुळे शहरातील संतोषी माता मंदिर परिसर, फुलवाला चौक, आग्रा रोड, देवपूर दत्त मंदिर, मिल परिसर येथे बाजारपेठ सजली होती. गणपती मूर्ती घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. पारंपारिक वेशभूषेसह ढोल ताशांच्या गजरात गणपती मूर्तींची मिरवणूक काढून आपल्या घरी तसेच मंडळांमध्ये गणरायाचे स्वागत करण्यात आले.
सुंदर अशा गणपतीच्या मूर्ती, फळे, पत्री, सजावटीचे साहित्य, फुलांच्या माळा यामुळे बाजारपेठ सजली होती. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येपासूनच गणपती घेण्यासाठी नागरिक बाजारात गर्दी करताना दिसून आले. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गणेशाची स्थापना करण्यासाठी गणपती तसेच पूजा साहित्य घेऊन धुळेकर भाविक घराकडे निघाले. अनेक गणेश मंडळांनी तर एक दिवस आधीच गणपती मिरवणूक काढून मोठ्या मूर्ती पेंडालमध्ये विराजमान केल्या. तर आजही छोट्या मोठ्या गल्लीबोळातून उत्साहीत बालकांनी गणपतीच्या मिरवणुकी काढल्या. शहरात यंदा अनेक मंडळांनी मोठ्या प्रमाणात उत्सवाचे आयोजन केले असल्याने काही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. लोकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागला. त्यामुळे पेठ परिसरात वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणावर होताना दिसली.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त : मंगळवारपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाने सर्वत्र चोख बंदोबस्त तैनात केला आहे. पथदिवे सुरू करून सीसीटीव्हीचा वॉच देखील ठेवण्यात येत आहे. पोलीस दलासोबतच गृहरक्षक दल, आरसीपी पथक, एसआरपीएफ पथक ही तैनात आहेत. हद्दपारीचे आदेश काढून असामाजिक तत्त्वांची जिल्हाबाहेर रवानगी करण्यात आली आहे.
हेही वाचा