चार मित्रांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करताना साऱ्यांचे डोळे पाणावले
धुळे : नाशिक जिल्ह्यातील चांदवडनजीक मुंबई-आग्रा महामार्गावर सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चार मित्रांपैकी दोन मित्रांवर धुळे शहरात तर अन्य दोन मित्रांवर अवधान गावात एकाच वेळी अग्नीडाग दिला गेल्याने अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या सगळ्यांचे डोळे पाणावले होते. काय बोलावे कोणाला काहीच कळत नव्हते. साऱ्यांचे मन सुन्न झाले होते…
नगरसेवक किरण अहिरराव यांच्यासह चौघा मित्रांचा चांदवडजवळ भीषण अपघात मृत्यू झाल्याची घटना शहरासह संपूर्ण तालुक्याला चटका लावणारी ठरली. रात्री चाैघांनी अवधान येथे किर्तन एैकले. त्यानंतर मित्राला पहाण्यासाठी ते नाशिकला रवाना झाले. मात्र हा त्यांचा अखेरचा प्रवास असेल असे त्यांना क्षणभरही वाटले नसावे. सोमवारी सायंकाळी चाैघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापैकी नगरसेवक आणि मुख्याध्यापकांवर धुळे शहरात तर अन्य दोघांवर अवधान येथे अंत्यसंस्कार झाले. दुर्देवाने चांदवड रुग्णालयापासून आर्वीपर्यंतचा चौघांच्या शववाहिनीतील प्रवासही सोबतच झाला.
या घटनेमुळे केवळ मृतांच्या नातेवाईकांनाच नव्हे तर सर्वांनाच हादरा बसला आहे. भाजप नगरसेवक किरण हरिचंद्र अहिरराव (रा. सुयोग नगर, महिंदळे शिवार, साक्री रोड धुळे) हे त्यांचे मित्र कृष्णकांत चिंधा माळी (रा. राम मंदिराजवळ, मोघण, ह. मु. सिंचन भवन मागे धुळे), अनिल विष्णू पाटील व प्रवीण मधुकर पवार असे चौघे जण रुग्णालयात दाखल असलेल्या आपल्या एका मित्राला पहाण्यासाठी नाशिकला गेले होते. तत्पुर्वी त्यांनी अवधान गावात सुरु असलेले किर्तन ऐकले. त्यानंतर ते नाशिककडे मार्गस्थ झाले. त्यांचा हा प्रवास अखेरचा असेल असे काेणाला क्षणभरही वाटले नाही. अपघातानंतर चांदवड रुग्णालयात चौघांचे शवविच्छेदन झाले. त्यानंतर चार शववाहिन्यांमध्ये चांदवडपासून धुळ्याकडे अखेरचा प्रवास झाला. चार शववाहिन्या आर्वीजवळ पोहोचल्यानंतर कृष्णकांत माळी यांचा मृतदेह आर्वीपासून मोघण गावाकडे रवाना झाला. त्यांच्या शाळेवर अंत्यदर्शनासाठी अर्धातास शववाहिनी थांबविण्यात आली. त्यानंतर त्यांचा पार्थीव देह धुळ्याकडे रवाना झाला. तर उर्वरीत तीन शववाहिनी धुळ्याकडे आल्या. त्यापैकी अवधान येथील अनिल आणि प्रविण यांचे मृतदेह असलेल्या शववाहिनी अवधान जवळ थांबविण्यात आल्या. तर किरण अहिरराव यांची शवववाहिनी थेट घराकडे रवाना झाली.
दरम्यान, सायंकाळी ५ वाजेला धुळे शहरातुन सुयोग कॉलनी येथील राहत्या घरापासून अहिरराव यांची तर सिंचन भवनच्या पाठीमागे वास्तव्यास असलेल्या माळी यांची अत्यंयात्रा सोबत काढण्यात आली. ५.३० वाजेला दोघांवर कुमारनगर येथील स्मशानभुमीत एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. आतापर्यंत सोबत प्रवास करणाऱ्या दोघा मित्रांवर एकाच वेळेस अंत्यसंस्कार झाले. यावेळी सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील गोतावळा मोठ्या प्रमाणात जमा झाला होता.
अवधानचा गणेशोत्सव रद्द : अवधान गावातील अनिल विष्णू पाटील व प्रवीण मधुकर पवार हे दोन्ही मित्र नेहमीच सोबत वावरणारे. त्यांचे पार्थीव देह पाच वाजेला गावात आणण्यात आले. त्यानंतर दोघांची अत्यंयात्रा सायंकाळी ५ वाजेला सोबत काढण्यात आली. दोघांवर अवधान गावातील स्मशानभूमीत सोबतच अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने संपूर्ण अवधान उपनगरावर शोककळा पसरली. एकीकडे गणेश मंडळाची गणेशोत्सवासाठीची तयारी सुरु असतांना ही घटना घडली. यामुळे गावातील सर्व गणेश मंडळानी यावर्षी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला. अंत्यसंस्कारानंतर गावात गणेशोत्सवासाठी उभारलेले सर्वच मंडप काढण्यात आले.
शेवटचा सेल्फी पाहून सारेच हळहळलेअपघातात मृत झालेले किरण अहिरराव, प्रविण पाटील, अनिल पवार आणि कृष्णकांत माळी हे चौघेही जिवलग मित्र होते. किरण अहिरराव हे धुळ्यातील बालरोग तज्ज्ञ डॉ. महेश अहिरराव यांचे लहान बंधू होते. धुळे महापालिकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ते भाजपच्या तिकीटावर प्रभाग क्रमांक सहामधून निवडून आले होते. तसेच त्यांच्या पत्नी भारती अहिरराव यादेखील यापुर्वी दोनवेळा धुळे जिल्हा परिषदेच्या सदस्या राहिल्या आहेत. किरण अहिरराव यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ, बहिण, वहिनी असा परिवार आहे. तसेच या अपघातात मृत कृष्णकांत माळी हे मोघण येथील ज्ञानज्योती विद्या प्रसारक संस्थेचे संस्थापक चिंधा माळी यांचे सुपूत्र होते. मोघणचे माजी उपसरपंच असलेले कृष्णकांत माळी हे सदर संस्थेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. कृष्णकांत हे बाबा नावाने परिचित होते. कोरोना काळात त्यांच्या पत्नीचे निधन झाले होेते. त्यानंतर त्यांनी दोन महिन्यांपुर्वीच दुसरा विवाह केला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. चौघेजण जिवलग मित्र होते आणि शेवटच्या श्वासापर्यंत सोबतच राहिले, अशी भावनिक चर्चा होती. अपघाताच्या आधी किरण अहिरराव यांनी घेतलेला शेवटचा सेल्फी चौघांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि तो पाहून सारेच हळहळले…
हेही वाचा