धुळे शहरात घरफोड्या करणाऱ्या दोन चोरांना पकडण्यात पोलिसांना यश
धुळे : येथील आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी झालेल्या घरफोड्यांचा तपास पोलिसांनी लावला असून दोंघा संशयीताकडून हजारोंचा मुद्देमाल जप्त केला. अन्य एक संशयित फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ ते ९ सप्टेंबर दरम्यान धुळे शहरात मनमाड जीनमधील स्वप्निल सुनील गवळी यांच्या बंद घरातून अज्ञात चोरांनी १७ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व ३० हजारांची रोकड लांबवली होती. याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याच भागातील रामदेव बाबानगरमधील रहिवाशी शेख नजीर शेख नदीर यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरांनी १० हजाराची रोख रक्कम, १९ हजार ६०० रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने असा २९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी देखील आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात.
दरम्यान, गुन्हे शाखेमार्फत या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना, सदर गुन्हे साहिल सत्तार शहा याने त्याच्या अन्य साथीदारांच्या मदतीने केल्याची टिप पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी साहिल यास ताब्यात घेतले. यावेळी साहिल याने दिलेल्या माहितीनुसार, तोसिफ सलीम शाह या त्यांच्या साथीदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघांकडून ५२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यात सोने-चांदीचे दागिन्यांचा समावेश आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी पथकातील संदीप पाटील, प्रकाश माळी, योगेश शिरसाठ, मुख्तार मन्सुरी, शांतीलाल सोनवणे, गौतम सपकाळे, संदीप कढरे, योगेश शिंदे, अविनाश लोखंडे, अजहर शेख, सचिन जगताप, पंकज जोंधळे, अनिल शिंपी, व संतोष घुगे यांच्या मदतीने पूर्ण केली. दोघाही संशयीतांना अटक केली आहे. अन्य एक संशयित फरार असून त्याचा शोध सुरू आहे.