ईद-ए-मिलाद मिरवणुकीला हिंदू वस्त्यांमधून विरोध
धुळे : गणपती विसर्जनासाठी स्वतःचा सण दोन दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय घेणाऱ्या मुस्लीम समाजाच्या ईद-ए-मिलाद मिरवणुकीला हिंदू वस्त्यांचा तसेच व्यापारी वर्गाचा विरोध असल्याचा दावा धुळे शहरातील हिंदूत्ववादी संघटनांनी केला आहे. मुस्लीम समाजाच्या मिरवणुकीला हिंदू वस्त्यांमधून परवानगी देवू नये, अशी मागणी या संघटनांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
विशेष म्हणजे ईद-ए-मिलाद आणि अनंत चतुर्दशी 28 तारखेला एकाच दिवशी येत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण येऊ नये यासाठी ईद-ए-मिलाद सण दोन दिवसानंतर म्हणजे 30 तारखेला साजरा करण्याचा निर्णय मुस्लीम समाजाने याआधीच घेतला आहे.
दरम्यान, हिंदूत्ववादी संघटनांनी सोमवारी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २८ सप्टेंबर रोजी मुस्लीम समाजाचा सण मोहम्मद पैगंबर यांची जयंती असून, त्या दिवशी ईद-ए-मिलादच्या निमित्ताने धुळे शहरातील आग्रा रोड परिसर म्हणजेच हिंदू बहुल भागातून हजारोंच्या संख्येने मुस्लीम समाजाकडून मिरवणूक काढली जाते. त्या मिरवणुकीत देश विघातक, राष्ट्र विघातक कृत्ये केली जातात. तसेच भारतीय राष्ट्रीय ध्वज तिरंगाचा देखील अवमान केला जातो.
ज्याप्रमाणे हिंदू धर्माच्या विविध सण उत्सवांना मुस्लीमबहुल भागातून प्रशासनाकडून कायदेशीर परवानगी नाकारली जाते त्याचप्रमाणे मुस्लीम समाजाच्या सण उत्सवाच्या मिरवणुकींना देखील हिंदूबहुल भागातून परवानगी देण्यात येऊ नये. हिंदू बहुल भागातून (आग्रा रोड) येथून निघणाऱ्या ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीतील मार्गात हिंदू धर्माची अनेक पवित्र श्रद्धा स्थान म्हणून मानली जाणारी मंदिरे आहेत. ज्यात खंडेराव महाराज मंदिर, भगवान नरसिंह मंदिर, छोटा बालाजी मंदिर, स्वामी नारायण मंदिर, चंद्रप्रभू दिंगबर जैन मंदिर, गणेश मंदिर, श्रीराम मंदिर, महादेव मंदीर, हनुमान मंदिर, नारायण बुवा समाधी मंदिर, श्रीराम मंदिर पुरातन म्हणजे हे मंदिर फार जुने बहुतेक शिवकालीन असेल अशी सर्व मंदिरे येतात.
सदर ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीच्या समाजातील काही तत्वांकडून आक्षेपार्ह घोषणा देऊन तसेच मंदिराजवळ अनुचित प्रकार समोर आला आहे. हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याचे प्रकार घडले आहेत. तसेच दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करून दंगल घडविण्याच्या उद्देशाने देखील मंदिराची विटंबना करण्याच्या घटना मागील अनेक मिरवणुकीतून घडलेल्या आहेत. ०९ ऑक्टोबर २०२२ रोजी हिंदू बहुल भागातून निघालेल्या ईद-ए-मिलाच्याच्या मिरवणुकीत काही तत्वांकडून आक्षेपार्ह घोषणा दिल्या गेल्या आणि सदर मिरवणुकीत राष्ट्रीय ध्वज तिरंगावर आक्षेपार्ह लिहून तो मिरवणुकीत फडकवला गेला. ज्यामुळे भारतीय ध्वजाचा देखील अवमान राजरोसपणे आणि सर्रासपणे केला. धुळे शहरात एक प्रकारे दहशत माजविण्याचा प्रयत्न केला गेला. सदर कृत्याच्या माध्यमातून काही तत्वे त्या मिरवणुकीचे संचालन करत होती. त्या संदर्भात विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या माध्यमातून दिनांक ११/१०/२०२२ रोजी आझादनगर पोलीस स्टेशनमध्ये संबंधित मिरवणुकीचे व्हिडिओ सादर करून गुन्हा देखील नोंद करण्यात आला.
तसेच या भागात ९० टक्के व्यापारी बांधव हे हिंदू असून, त्यांच्या दुकानांची देखील तोडफोड यापूर्वी केली गेली आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता ईद-ए-मिलादच्या धुळे शहरातून निघणाऱ्या मिरवणुकीस हिंदू बहुल भागातून (आग्रा रोड परिसरातून) जाण्यास परवानगी देण्यात येऊ नये.
जिल्हा प्रशासनाने सदर मिरवणुकीस परवानगी दिली अथवा बेकायदेशीररित्या सदर मिरवणूक हिंदू बहुल भागातून निघाल्यास विश्व हिंदू परिषद, बजरंग दल सकल हिंदू समाजाला सोबत घेऊन संविधानिक मार्गाने येणाऱ्या काळात धुळे जिल्हाभरात आंदोलन करण्यात येईल. त्यामुळे शहराचे व जिल्ह्याचे वातावरण दूषित झाल्यास आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलिस प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा जिल्हाध्यक्ष योगीराज मराठे, प्रदीप जाधव, हेमंत कचवे, हिरामण गवळी, विशाल विसपुते, प्रकाश उजाडे, अरुण पवार, संदीप चौधरी, गुलाब माळी, विनोद सोमानी, विजय पाच्छापूरकर, साजन मोरे, किशोर अग्रवाल आदींनी दिला आहे.
हेही वाचा