लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची ‘वंचित’ची तयारी
मुंबई : काँग्रेस पक्षात प्रचंड गोंधळ आहे. शिवसेनेशी युती कायम असली तरी शिवसेना इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे. त्यामुळे लोकसभेच्या महाराष्ट्रातील सर्व 48 जागा स्वबळावर लढविण्याची तयारी वंचित बहुजन आघाडीने सुरू केली आहे, असे वक्तव्य करून ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली.
काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी अदानीला विरोध करतात. दुसरीकडे इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार मात्र अदानींची बाजु घेतात. याबद्दल काॅंग्रेसला प्रश्न विचारला पाहिजे, अशी टिका देखील आंबेडकर यांनी केली. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर पक्षाचे आता दोन गट झाले आहेत. या फूटीमुळे पक्षाची ताकद कमी झाली असली तर शिवसेनेच्या ठाकरे गटाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरची महाविकास आघाडी कायम ठेवली आहे. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीबरोबर युती करून पक्षाची ताकद वाढवली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीबरोबर युती असली तरी त्यांचा पक्ष महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडीबरोबर एकत्र आहे. परंतु, प्रकाश आंबेडकर हे मविआ आणि इंडिया आघाडीपासून अलिप्त आहेत. त्यामुळे ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रत्येकी १६ जागांवर निवडणूक लढतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला त्यांच्याबरोबर घेण्यास अनुकूल नाही. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाला त्यांच्या कोट्यातील १६ जागांपैकी काही जागा वंचित बहुजन आघाडीला द्याव्या लागतील, अशा प्रकारचे तर्क राजकीय विश्लेषक मांडत आहेत.