शिरपूर शहरातील होळकरकालीन ऐतिहासिक पायविहीर बुजविण्याचा घाट
धुळे : शिरपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली होळकरकालीन ऐतिहासिक पायविहीर बुजवून त्यावर अनधिकृत बांधकाम करण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे धनगर समाज आक्रमक झाला असून, हा प्रकार रोखण्यासाठी त्यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. खोटी आणि बनावट कागदपत्रे तयार करून विहिरीची जागा हडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. असे असताना राजकीय दबावापोटी कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप धनगर समाजाने केला आहे. ही विहीर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या काळात बांधली असल्याची माहिती धनगर समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
शिरपूर शहरात गांधी मार्केटमधील पुरातन पायविहिर बेकायदेशररित्या बुजवून त्या जागी बांधकाम करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा जन आंदोलन छेडले जाईल, असा इशारा धुळे जिल्हा सकल धनगर समाज, महाराष्ट्र धनगर समाज महासंघ, धुळे जिल्हा मल्हार सेनेतर्फे जिल्हा प्रशासनाला दिला. जिल्हा प्रशासनासह उपविभागीय अधिकारी, शिरपूर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गुजराथी ( वाणी) पंच मंडळ, शिरपूर आणि अविनाश पोपटलाल शहा, तेजस कन्ट्रक्शन यांनी शिरपूर शहरातील गांधी मार्केटमधील सि. स. नं. १८ मधील पुरातन पायविहिर बेकायदेशीररित्या बुजवून नष्ट केली. त्याजागी आता बांधकाम करण्यात येणार आहे.
मात्र सदर पायविहीर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बारा ज्योतिर्लिंगाच्या जलअर्पणासाठी तसेच सर्वसामान्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी या उद्देशाने बांधली होती. सदरच्या विहीरीवर अविनाश पोपटलाल शहा हे इतर इसमाच्या तसेच जेसीबीच्या सहाय्याने बेकायदेशीररित्या बुजुवून त्यावर अनधिकृत बांधकाम करण्याच्या तयारीत आहेत. परिणामी शिरपूर शहरातील नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावत असल्याने शहरातील वातावरण दूषित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी.
अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा धनगर समाजाने दिला. निवेदन देताना सुनील वाघ, नगरसेवक अमोल मासुळे, योगेश पाकळे, दिलीप धनगर, मुकेश थोरात, निंबा लांडगे, मनोज धनगर, सुनील धनगर, सोमनाथ धनगर, दीपक धनगर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा