मिरवणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनसह सीसीटीव्ही कॅमेरे अन् पोलिसांचा मोठा फौजफाटा
धुळे : गणपती विसर्जनासह ईद-ए-मिलाद मिरवणुका उत्साहात अन् शांततेत पार पाडा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी काही विशेष सूचना जारी केल्या आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आवाहन असे:
२८ सप्टेंबर रोजी अनंत चतुदर्शी असून २९ रोजी ग्रामिण भागातील व रोजी धुळे शहरात ईद-ए-मिलाद सणानिमित्त मिरवणुक निघणार आहे. दोन्ही मिरवणुकीच्या अनुषंगाने मी संजय बारकुंड पोलीस अधीक्षक, धुळे जनतेला आवाहन करू इच्छितो की,
१) दि. २८/०१/२०१३ रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी सर्व सार्वजनीक गणेश मंडळांचे विर्सजन होईल. त्यानंतर कोणत्याही गणेश मंडळांचे विसर्जन होणार नाही. सर्व सार्वजनीक गणेश मंडळांनी दि. २८/०९/२०२३ रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी सार्वजनीक गणेश मंडळांचे विर्सजन करुन घ्यावे.
२) दि. २९/०९/२०२३ रोजी धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील व तालुक्यातील ईद-ए-मिलाद सणानिमीत्ताने निघणाऱ्या ०६ मिरवणुका असून त्यांनी ठरवून दिलेल्या मार्गावरुनच मिरवणूक काढावी. त्या मार्गामध्ये कोणताही बदल करण्यात येवु नये.
३) दि. ३०/०९/२०२३ रोजी धुळे शहरातील ईद-ए-मिलाद मिरवणूक सकाळी ९ वाजता सुरू होवुन दुपारी १३.३० वाजेच्या दरम्यान अंजनशहा दर्गा येथे पोहचेल. या बेताने मिरवणूक आयोजकांनी मिरवणूक काढावी.
४) सर्व गणेश मंडळांची व ईद-ए-मिलाद मिरवणूक आपल्या पांरपारीक मार्गाने राहतील. त्यामध्ये कोणीही विनापरवाना बदल करण्याचा प्रयत्न करु नये.
५) गणपती मिरवणूक व ईद-ए-मिलाद मिरवणूकीमध्ये कोणीही प्रक्षोभक वक्तव्ये, घोषणा, नारेबाजी, अंगविक्षेप इत्यादी करणार नाही. जेणे करून इतर जाती-धर्माच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे तणाव व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकेल.
६) मुख्य मिरवणूक मार्गावर गणेश मंडळांचे आणि ईद-ए-मिलाद मिरवणुकीचे स्वागत करण्याकरीता उभारण्यात येणारे मंडप हे रस्त्याच्या डाव्या बाजुस असावे. त्यांचे ठिकाण, साईज, उंची हे स्थानिक पोलीस स्टेशन व वाहतूक पोलीस यांच्याकडून ठरविण्यात येईल. त्याबाबत आगाऊ परवानगी घेण्यात यावी. सदर मंडपांमुळे कोणताही रहदारीस अडथळा येवु नये याची खबरदारी घ्यावी. तसेच मंडपात डि. जे. (डॉल्बी सिस्टीम) लावु नये व मंडपासमोर गणेश मुर्तीची आरती करण्याकरीता मिरवणूक थांबविण्यात येवु नये.
७) कोणतेही गणेश मंडळ एकाच ठिकाणी चार पाच गाणी लावून, वाजवुन मिरवणूक रेंगाळत ठेवणार नाही. असे केल्यामुळे मागील लहान गणेश मंडळांना मुख्य मिरवणूक मार्गावर येण्याची संधी उपलब्ध होत नाही. त्यांनी केलेली आरास, देखावे, सादरीकरण, पारंपारीक वेशभूषा, नृत्य इत्यादी नागरीकांना पाहण्याची संधी मिळत नाही.
८) गणेश मंडळांची मिरवणूक मागील अनुभव पाहता मिरवणुका संध्याकाळी उशीराने सुरु करण्यात येतात. त्यामुळे नागरीकांचे व गणेश भक्तांचे उत्साहाचे प्रमाण कमी होवुन मिरवणुकांचा आनंद घेता येत नाही, वेळ कमी पडतो. त्यामुळे सर्व गणेश मंडळांना आवाहान करण्यात येते की, विर्सजन मिरवणूक लवकर सुरु करण्यात यावी. ज्यामुळे सर्व मंडळांना मुख्य मार्गाक्रमण करता येईल.
हिंदू बांधव…
दि. २८/०९/२०२३ रोजीच्या मध्यरात्री गणपती विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर दि. २९/०९/२०२३ च्या पहाटे सुर्योदया पावेतो मुख्य मिरवणूक मार्गावर गणेश मंडळासंबंधीचे लावलेले झेंडे, बॅनर, पताका इत्यादी संबंधित गणेश मंडळांनी काढून घ्यावेत. अन्यथा मनपा प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून सदरचे झेंडे, बॅनर, पताका काढण्याची कार्यवाही करण्यात येईल.
मुस्लिम बांधव…
दि. ०१/१०/२०२३ रोजी पहाटे सूर्योदयापूर्वी ईद-ए-मिलाद सणाच्या मुख्य मिरवणूक मार्गावरील लावलेले झेंडे, बॅनर, पताका इत्यादी संबंधितांनी काढून घ्यावेत. अन्यथा मनपा प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून सदरचे झेंडे, बॅनर, पताका काढण्याची कार्यवाही करण्यात येईल.
कडेकोट पोलीस बंदोबस्त
दोन्ही सण शांततेत साजरा होण्याकरिता पोलीस विभागाकडून पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, दोन उपविभागीय पोलीस अधिकारी, १५ पोलीस निरीक्षक, ६७ सपोनि/ पोसई, १२३० पोलीस अंमलदार, ७०० पुरुष होमगार्ड, १०० महिला होमगार्ड, एस. आर. पी. एफ. कंपनी , ४ आर. सी. पी. पथक, ०२ क्यू. आर. टी. पथक, ०४ स्टेकिंग पथक, साध्या वेशातील १० पोलीस पथके असा कडेकोट बंदोबस्त असणार आहे.
ड्रोनसह सीसीटीव्ही कॅमेराचा वाॅच
मिरवणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी दोन ड्रोन कॅमेरे व वॉच टॉवर असेल. तसेच विसर्जन मिरवणूक मार्गावर असलेले व्यापारी वर्गाने व खाजगी व्यक्तींनी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे यांची दिशा मुख्य मिरवणुकीच्या मार्गाकडे ठेवून त्याद्वारे मिरवणुकीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे दोन्ही सण आनंदाने व शांततेने व जातीय सलोखा राखून साजरा करण्याचे मी आव्हान करतो.