तरूणाची दुचाकी, मोबाईल, पैसे लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी पकडले
धुळे : शहरातील शासकीय दूध डेअरी रोड परिसरातील केदार सिटी भागात मारहाण करीत एकाची एक्टिवा मोटार सायकल, मोबाईल आणि ५०० रुपयांची रोकड लुटून फरार झालेल्या दोन संशयितांना पकडण्यात शहर पोलिसांना अखेर यश आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सूत्रांनी उजद लाल जाट (वय १८, रा. आत्मज, देवरिया भीलवाडा, राजस्थान) याने याबाबत पोलिसांत फिर्याद दिली होती. २१ सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसातला तीन अज्ञात व्यक्तींनी लिफ्ट देण्याची विनंती करून त्यास थांबविले व मारहाण करत त्यांच्या ताब्यातील दहा हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची एक्टिवा मोटारसायकल, दोन हजाराचा मोबाईल आणि ५०० रुपयांची रोकड लुटली. त्यानंतर संशयित घटनास्थळावरून पसार झाले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान, मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे पोलिसांचे पथक नवापूर व सुरत येथे रवाना झाले. ललित चौधरी आणि रमेश सोन्नर हे पांढऱ्या रंगाच्या एक्टिवासह नवापूर येथून त्यांच्या राहत्या घरी धुळे शहरात येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस पथक धुळे येथे परत आले व संशयतीच्या राहत्या घराजवळ सापळा लावण्यात आला.
यावेळी दोन जण एक्टिवा मोटारसायकलवर आले. वाहन चालविणाऱ्या या व्यक्तीस त्याचे नाव विचारता त्याने आपले नाव ललित बापू चौधरी (वय २२, रा. श्रीरामनगर मिल परीसर धुळे) व त्याच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने आपले नाव रमेश राजू सोन्नर (वय १९, रा. पिंजारी चाळ, मिल परिसर धुळे) असे असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यांच्याकडील वाहनांची कागदपत्र पोलिसांनी मागितली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यावेळी पोलिसांनी वाहन नोंदणी संदर्भात आवश्यक ती माहिती घेतली व अंमलदार यांच्या मदतीने हे वाहन ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.
अधिक चौकशी केल्यावर दोन्ही संशयतांनी भैय्या पिंजारी याच्या सांगण्यावरून जाट याची लुटमार करण्याच्या हेतूने त्यास मारहाण केली व त्याच्याकडील मोटारसायकलसह मोबाईल व पैसे हिसकावून पोबारा केला होता. या नंतर भैय्या पिंजारी हा मोबाईल घेवून सुरत येथे निघून गेला होता. तेथे त्याने एक्टिवावरील नाव बदलेले होते. याप्रकरणी २६ सप्टेंबर रोजी दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक उजे यांच्यासह विजय शिरसाट, दिनेश परदेशी, कुंदन पटाईत, रवींद्र गिरासे, मनीष सोनगिरे, महेश मोरे, प्रवीण पाटील, केतन पाटील, अमोल पगारे, वसंत कोकणी, तुषार पारधी, योगेश ठाकूर, अमित रनमाळे यांनी पथकामार्फत पूर्ण केला.
हेही वाचा