धुळ्यात शिव महापुराण कथेला सुरुवात, कथा ऐकण्यासाठी भाविकांची गर्दी
धुळे : शहरातील मालेगाव रस्त्यावरील खानदेश गोशाळा मैदानावर ३० सप्टेंबरपासून शिव महापूराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. 8 ऑक्टोबरपर्यंत होणाऱ्या या कथेचे निरूपण गुजरात राज्यातील गिरी बापूजी यांच्या सुमधुर वाणीतून होत आहे. कथेचा लाभ घेण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टीचे धुळे विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल तसेच पुरणमल बालूराम परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
धुळे शहरातील खानदेश गौशाळा मैदानात ३० सप्टेंबर ते ८ ऑक्टोंबर दरम्यान शिव महापूराण कथा सुरू आहे. या कथेचे आयोजन भारतीय जनता पार्टीचे धुळे विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल यांनी केले. कथेचे निरूपण गुजरात राज्यातील पूज्य गिरी बापूजी करीत आहेत.
निरूपणकारांविषयी माहिती अशी: पूज्य बापुजी यांचा जन्म गुजरात राज्याच्या सौराष्ट्र प्रांतातील काठीयावाडमध्ये झाला आहे. पूज्य बापुजी यांनी भावनगर नजीकच्या आनंदनगरमधील स्वामीनारायण मंदिरात सर्वात प्रथम १९९७ मध्ये शिव महापूराण कथेचे निरूपण करण्यास सुरुवात केली. यानंतर जगभरातील ४० देशांमध्ये त्यांनी कथेचे निरूपण केले आहे. धुळ्यातील ही त्यांची ७६४ वी शिवमहापुराण कथा आहे. बापूजी यांच्या आजोबांच्या हाताने भव्य शिव मंदिराचे निर्माण झाले असून या मंदिराचा जिर्णोद्धार पूज्य बापूजी यांनी केला आहे. विशेष म्हणजे बेल पत्राच्या एक लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प त्यांनी केला असून आतापर्यंत चाळीस हजार बेल पत्राचे वृक्ष जगवण्यात यश आले. पूज्य बापुजी यांच्या मार्गदर्शनाखाली गोशाळा चालवली जाते. त्यात ५५० पेक्षा जास्त गोमातांची सेवा केली जाते. यात केवळ २० टक्के गोमाता दूध देणाऱ्या असून उर्वरित वृद्ध गोमाता आहेत. मात्र त्यांची सेवा नियमितपणे केली जाते. गिरी बापूजी यांनी भारत आणि देशाबाहेर कार्यक्रमांमधून भगवान श्री शंकराचे महात्म्य भाविकांपर्यंत पोहचवले आहे.
अशी आहे भाविकांची व्यवस्था: धुळे शहरातीलगोशाळा मैदानात सुमारे पंधरा हजार भाविक बसू शकतील एवढी व्यवस्था करण्यात आली आहे. कथेचे निरूपण दुपारी तीन ते सहा वाजेदरम्यान होणार असून कथास्थळावर दररोज महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. भाविकांसाठी विविध समित्या गठीत केल्या आहेत. स्वयंसेवकांच्या माध्यमातून आरोग्य सुविधा पुरवली जाणार आहे. त्याचप्रमाणे कथा स्थळावर पोहोचण्यासाठी डी मार्टच्या बाजूने प्रवेशद्वार केले आहे. दसेरा मैदानपासून अग्रवाल नगरातून देखील प्रवेशद्वार करण्यात आले आहे. भाविकांच्या वाहनांना थांबवण्यासाठीही व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी देखील स्वयंसेवक तैनात आहेत. धुळ्यात होणाऱ्या या शिव महापुराण कथेचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कथेचे आयोजक तथा भारतीय जनता पार्टीचे धुळे विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल तसेच पुरणमल बालूराम परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.