रक्तदानासह भव्य मिरवणूक काढून हजरत मोहम्मद पैगंबर जयंती साजरी
धुळे : ‘नारा ए तकबीर, अल्लाहू अकबर…’ अशा जोरदार घोषणा देत शनिवारी धुळे शहरात आग्रा रोडवरून मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलाद निमित्त भव्य जुलूस काढला. तत्पूर्वी ईदच्या दिवशी 28 तारखेला रक्तदान शिबीरं आणि विविध कार्यक्रमांनी हजरत मोहम्मद पैगंबर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
गणपती विसर्जन आणि ईद-ए-मिलाद 28 तारखेला एकाच दिवशी आल्याने पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण येऊ नये तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुस्लिम बांधवांनी दोन दिवस उशिरा म्हणजे 30 तारखेला मिरवणूक काढून सण साजरा केला.
मुस्लिम बांधवांचा पवित्र सण असलेल्या ईद-ए-मिलाद निमित्त शहरातून भव्य जुलुस काढण्यात आला. यावेळी पुष्पवृष्टी करण्यात आली. मिरवणुकीत मुस्लिम बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणूक दुपारी दीड वाजता दाता सरकार येथे पोहोचली. त्यानंतर मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
शनिवारी सकाळी नऊ वाजता मुस्लिम बांधवांतर्फे शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मच्छी बाजार येथून या मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी आमदार फारुख शाह, पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, शव्वाल अन्सारी, अमीन पटेल, आदींच्या हस्ते मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला. त्यात मुस्लिम धर्मगुरूंसह मुस्लिम बांधव हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते. प्रभाकर टॉकीज, बारा पत्थर, मामलेदार कचेरी मार्गे, अकबर चौकातून आग्रा रोडने थेट पांझरा नदी किनारील दाता सरकार येथे मिरवणुकीचा समारोप झाला.
मिरवणुकीत ठीकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. राष्ट्रवादीतर्फे करांचीवाला खुंटाजवळ इर्शाद जहागीरदार, शहराध्यक्ष कैलास चौधरी यांनी पुष्पवृष्टी करत मिरवणुकीचे भव्य स्वागत केले. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे पवार गटातर्फे रणजीत भोसले यांनीही स्वागत केले. सामाजिक कार्यकर्ते जावेद बिल्डर यांनी पाणी बॉटलचे वाटप केले. गोविंद साखला यांनी देखील ईदच्या जुलूसवर पुष्पवृष्टी केली. मुस्लिम बांधवांना शिधा वाटप केला. आमदार फारुख शाह यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांचे पुष्पगुच्छ देऊन गोविंद साखला व डॉ. सलीम शेख यांनी स्वागत केले. यावेळी बापू सावंत, राजू साखला, कलीम शेख, हाजी हमीद, जब्बार पैलवान, हामू पैलवान, आयुबु बारीक, सागर साखला, आकाश साखला उपस्थित होते.
मिरवणुकीत पोलीस प्रशासनाने चौख बंदोबस्त ठेवला होता. त्यात पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, डी. वाय. एस. पी. सचिन हिरे, एलसीबी पीआय हेमंत पाटील, आझाद नगर पोलीस ठाण्याचे पीआय नितीन देशमुख, धुळे शहरचे पीआय आनंद कोकरे, यांनी बंदोबस्त ठेवला होता.
अनंत चतुर्दशी, मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर
धुळे जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत गणेश विसर्जन आणि मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीचे औचित्य साधून धुळे शहरातील मनोहर सिनेमा मागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात अल मदद ग्रुपतर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सर्वधर्मिय युवकांनी मोठ्या संख्येने या रक्तदान शिबिरात सहभागी होत प्रतिसाद दिला. या रक्तदान शिबीराचा शुभारंभ दलितमित्र वाल्मिक दामोदर यांच्या हस्ते करण्यात आला. या शिबीरात सर्वच जाती-धर्मातील रक्तदात्यांनी रक्तदान करुन मोहम्मद पैगंबर यांची ईद मिलाद साजरी केली. हिंदू- मुस्लिम एकतेचा संदेश देत इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांनी सर्व जगाला मानवतेचा व एकतेचा संदेश देऊन इस्लाम धर्माचा प्रचार व प्रसार केला. त्यामुळे सध्या धुळे जिल्ह्यात रक्ताचा तूतवडा लक्षात घेता आणि माणुसकी हाच खरा धर्म आहे, अशी हजरत मोहम्मद पैगंबर यांची शिकवण लक्षात घेऊन या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.