‘सफरचंद’ नाटकाचा धुळ्यात 9 ऑक्टोबरला प्रयोग
धुळे : काश्मीरमधील कथानक असलेल्या ‘सफरचंद’ या नाटकाचा अनोखा प्रयोग धुळ्यात 9 ऑक्टोबरला हिरे भवनात आगळ्यावेगळ्या दुहेरी आणि फिरत्या रंगमंचावर सादर होणार आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या प्रसिद्ध टीव्ही मालिकेतील अभिनेत्री शर्मिला शिंदे या नाटकात प्रमुख भूमिकेत आहेत.
जम्मू-काश्मीरमधील झेलम नदी आणि स्नो फाॅल या नाटकाच्या माध्यमातून धुळेकरांना अनुभवायला मिळणार आहे. नाटकाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा आणि देशप्रेमाचा संदेश दिला असून, कोणत्याही जाती-धर्माच्या किंवा पक्ष-संघटनेच्या बाजुने झुकणारे हे नाटक नसल्याचा दावा कलावंतांनी शनिवारी धुळ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत केला. धुळेकर रसिक नाट्यप्रेमिंना निखळ नाटकाचा आनंद देणारे हे नाटक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
धुळ्यामध्ये मोठी व्यावसायिक नाटके येतच नाहीत अशी रसिक प्रेक्षकांची नेहमीच तक्रार असते. ही तक्रार रायजिरोने कंपनीने ओळखून ती मोडीस काढावी व धुळ्यात या नाटकापासून मोठी नाटकं धुळ्यात यावी यासाठी कोणतेही शुल्क न घेता धुळेकरांसाठी उपलब्ध करुन दिले आहे. रंगमंचाचा पडदा उघडताच डोळे दिपविणारे नेपथ्य आणि मनाला भिडणारे नाटकाचे सादरीकरण, म्हणजे ‘सफरचंद’ हे मराठी रंगभूमीवर नुकतेच पदार्पित झालेले नाटक !
काश्मीर खोर्यात नियंत्रण रेषेजवळ वसलेल्या ‘खानपुरा’ या गावात घडणारे हे नाट्य. हा केवळ नाट्यप्रयोग नाही, तर हृदयाला भिडणारी आणि अंतर्बाह्य हलवणारी तरुणांची एक कहाणी आहे. मोहम्मद, श्यामलाल, झेलम आणि अन्वर यांची ही कहाणी !
नाटकाची श्रेय नामावली:-
मराठी रुपांतर: मुग्धा गोडबोले दिग्दर्शक: राजेश जोशी कलाकार: शंतनू मोघे, प्रमोद शेलार, शर्मिला शिंदे नेपथ्य: संदेश बेंद्रे, निर्माते: भरत नारायणदास ठक्कर, प्रविण भोसले, अजय कासुर्डे विशेष आभार – मीनाक्षी सुधीर निंबाळकर
रायजिरो नेटवर्क्स प्रायव्हेट लिमिटेड, धुळेतर्फे खास धुळेकर रसिकांसाठी नि:शुल्क ‘सफरचंद’ हे नाटक आयोजित करण्यात आले आहे. रायजिरो नेटवर्क्स ही धुळे शहरातील बँकिंग क्षेत्रात काम करणारी नामांकित कंपनी आहे. या कंपनीतर्फे महाराष्ट्रासह इतर राज्यातही स्टेट बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ इंडिया यांचे ग्राहक सेवा केंद्र (सीएसपी सेंटर) देण्यात येते. कंपनीचे आतापर्यंत दोन हजाराहून अधिक सीएसपी सेंटर आहेत. या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळालेला आहे. या सोबतच कंपनीचे एक अॅप ज्याचे नाव ‘फायदा पे’ आहे, ते लाँच झालेले आहे. या अॅपद्वारे बँक अकाऊंट उघडणे, लोन, इन्शुरन्स, क्रेडीट कार्ड अशा सेवा मिळवता येतात किंवा देता येतात.