बुद्ध विहार हे चळवळ, परिवर्तन व प्रबोधनाचे केंद्र म्हणून सर्वांसाठी खुले असावे : अशोक सरस्वती बोधी
धुळे : येथील धुळे जिल्हा बुद्ध विहार समन्वय समितीमार्फत एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर रविवारी शिवतीर्थ ज्येष्ठ नागरिक संघ येथील सभागृहात आयोजित करण्यात आले होते. सदर प्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून अशोक सरस्वती बोधी (संस्थापक, बुद्ध विहार समन्वय समिती, नागपूर) हे उपस्थित होते.
सदर शिबीराची सुरुवात सकाळी ९:०० वाजता बुद्ध वंदनेने करण्यात आली. सदर शिबीरात प्रशिक्षणाची गरज, बुद्ध धम्माची जगाला गरज, धम्मप्रचाराचे घटक, सध्याची प्रसार अवस्था, बुद्ध विहार समन्वय समितीची वाटचाल, पाली भाषा परीक्षा, कार्यकर्ता कसा असावा ? या विषयावर अशोक सरस्वती बोधी यांनी स्वतंत्ररीत्या सहा व्याख्याने देऊन चर्चा घडवून आणली.
बुद्ध-विहार हे चळवळ, परिवर्तन व प्रबोधनाचे केंद्र झाले पाहिजे, विहारे सर्वांसाठी खुली असावीत असे अशोक बोधी यांनी सांगितले. शेवटी विविध प्रश्न व शंका यावर एक सत्र घेण्यात आले. सदर सत्रांदरम्यान राजीव हाके यांनी आपल्या वास्तव स्थितीचे विच्छेदन करणारी काव्ये सादर केलीत व सोनवणे यांनी सुमधुर आवाजात भीमगीत सादर केले. समितीचे कार्य करणारे व विशेष कामगिरी करणारे लोखंडे, रत्नमाला सोनवणे व कल्पना लोंढे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. शेवटी धुळे जिल्हा बुद्ध विहार समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा. विलास चव्हाण यांनी समितीच्या धुळे जिल्हा शाखेच्या कार्याची माहिती देऊन आभारप्रदर्शन केले.
सदर कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात नासिक, जळगाव, नंदुरबार, नगर, धुळे या जिल्ह्यातील उपासक बंधु-भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सदर प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी डॉ. एस्. यु. बिऱ्हाडे, इंजि. जी. बी. पवार, व्ही. टी. गवळे, किशोर शेजवळ, विनोदकुमार चव्हाण, बी. बी. साळवे, राजेंद्र थोरात, पी. यु. पवार, सुभाष निकुंबे, प्रा. संजय घोडसे, प्रा. आर. पी. नगराळे, प्रा. संजय ढोडरे, राजीव हाके, संजय निकुंबे, सिद्धार्थ जाधव, विशाल वाघोदे आदींनी परिश्रम घेतले.