धुळ्यात असा साजरा झाला महार रेजिमेंट स्थापना दिवस
धुळे : शहरातील सैनिक लॉन येथे यश सिद्धी माजी सैनिक सेवा संघ धुळे, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यातर्फे महार रेजिमेंटचा ८३ वा स्थापना दिवस रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला.
भारतीय संविधानाचे जनक भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नाने १ ऑक्टोंबर १९४१ रोजी महार रेजिमेंटची स्थापना झाली. शुरांची, विरांची, पराक्रमांची महार रेजिमेंट आहे. या रेजिमेंटच्या ८३ व्या वर्धापन दिनानिमित्त यश सिद्धी माजी सैनिक सेवा संघ आणि महार रेजिमेंट धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम झाला.
राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बारा बलुतेदार, अठरा पगड जातीच्या मावळ्यांनी तसेच शूरवीर महार सैनिकांनी गाजवलेल्या पराक्रमाच्या इतिहासाला उजाळा देण्यात आला. यावेळी अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला माजी सैनिकांनी मानवंदना दिली. त्यानंतर साडेनऊ वाजता परविर चक्र पदक विजेता बॉर्डर मास्टर शहीद अब्दुल हमीद यांच्या स्मारकास व राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील मानवंदना देण्यात आली. दहा ते एक वाजेपर्यंत जिल्हा सैनिक बहुद्देशीय हॉल या ठिकाणी भारतीय सैन्यातील शहीद झालेल्या जवानांना दीप प्रज्वलन करून श्रद्धांजली वाहण्यात आली. महार रेजिमेंटच्या वीरमाता, वीरपत्नी यांचा सन्मान केला.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, मुंबई इंदू मिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे प्रणेते, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आनंदराज यशवंतराव आंबेडकर, समता सैनिक दलाचे अध्यक्ष काकासाहेब खंबाळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात आनंदराज आंबेडकर, काकासाहेब खंबाळकर यांच्यासह प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानाच्या माध्यमातून ऐतिहासिक दाखले देत वैचारिक प्रबोधन केले.
संबंधित छायाचित्रे: