राष्ट्रवादी युवक काँग्रेस राज्याची जबाबदारी सारांश भावसार यांच्याकडे
धुळे : राष्ट्रवादी युवक काँग्रेस राज्याच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी युवा नेते सारांश भावसार यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय पक्ष नेतृत्वाने घेतला आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या एका समारंभात पक्षाच्या अजित पवार गटातर्फे त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (अजित पवार गट) मुंबई येथे झालेल्या बैठकीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मान्यतेनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार तथा नामदार छगन भुजबळ यांच्या शिफारशीने मंत्री अनिल पाटील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या हस्ते राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षपदी सारांश भावसार यांची नियुक्ती करण्यात आली.
उपाध्यक्षपदी नियुक्तीनंतर उत्तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्हे आणि तालुक्यात संघटनात्मक कामाला प्राधान्य देणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या धोरणात्मक मार्गदर्शनानुसार उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेस संघटनात्मक काम करणार आहे. गाव पातळीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून युवकांमधून उद्याचे भविष्य कसे घडवता येईल यासाठी भर दिला जाईल, असे सारांश भावसार यांनी सांगितले.
निवडीनंतर प्रदेश उपाध्यक्ष सारांश भावसार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नियुक्तीवेळी मंत्री अनिल भाईदास पाटील, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, जिल्हा निरीक्षक अर्जुन टिळे, किरण शिंदे, किरण पाटील, मयूर बोरसे यांची उपस्थिती होती. सारांश भावसार हे मंत्री छगन भुजबळ यांचे समर्थक मानले जातात.