१८ हजार दारू दुकानांच्या सरकारला गितांजली कोळींचा आमरण उपोषणाचा इशारा
धुळे : शाळा विकून 18 हजार दारू दुकाने सुरू करण्याचा घाट घालणाऱ्या सरकारला धुळ्यातील सामाजिक कार्यकर्त्या गितांजली कोळी यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला. हा इशारा देण्यासाठी त्यांनी मंगळवारी धुळ्यात लाक्षणिक उपोषण केले. सरसकट दारूबंदीची मागणी त्यांनी केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षापासून धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर देशी, गावठी, दारू सेवनाने आजारी पडून तसेच अपघात होऊन किंवा नशेत आत्महत्या करणाऱ्या पुरुषांचे, तरुणांचे दारूमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. दारूपायी जीवनाची आणि संसाराची राखरांगोळी झाल्यामुळे दररोज मानसिक अवहेलना झेलणाऱ्या महिलांचे प्रमाण अधिक जास्त आहे. यासाठी दारूबंदी मोर्चाच्या माध्यमातून गेल्या आठ वर्षांपासून गावोगावी दारूबंदी व्हावी यासाठी गावातील महिलांच्या माध्यमातून जीवाचे रान करून फिरत आहे. परंतु गावात सर्रासपणे विकल्या जाणाऱ्या गावठी तसेच देशी दारूला महिलांचा विरोध असताना अनेक गावातील सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडे मागणी करूनही दारूबंदीचे ठराव देत नाहीत. पोलीस कारवाई करतात, पण मुजोर दारू विक्रेते यांच्यावर मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल होत नसल्याने व मोठमोठ्या धडक कारवाया सलगपणे दारूबंदी विभाग तसेच पोलीस प्रशासनाकडून गावागावात होत नसल्याने दारूबंदीच्या कामाला यश मिळत नाही. गावागावातीलच नव्हे तर संपूर्ण धुळे जिल्ह्यातील महिलांची इच्छा असूनही जिल्ह्यात दारूबंदी होण्याचे आमचे भगीरथ प्रयत्न असफल होत आहेत. परंतु दारूबंदी करण्यासाठी महिला भगणींचे मत जाणून घेतले तर सर्वांना धुळे जिल्ह्यात दारूबंदी हवी आहे.
मागण्या अशा : १. धुळे जिल्ह्यात दारूबंदी करण्यात यावी. यासाठी मी आज महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करत आहेत. यांचा गंभीरतेने विचार व्हावा. २. महाराष्ट्रात शिंदे सरकारने महिलांच्या मतांचा अवमान करत महिलांच्या आयुष्याची दारुड्या नवऱ्यामुळे राखरांगोळी होत असताना, सरकारचा महसूल वाढवण्यासाठी १८ हजार नवीन दारू दुकानांना परवानगी देण्याच्या निर्णयाचा आम्ही समस्त महिला भगिनी तीव्र शब्दात निषेध करतो. हा तरुणांना दारुडे बनवण्याचा व महिलांवर अन्याय करणारा प्रस्ताव सरकारने मागे घ्यावा.
यासाठी हे लाक्षणिक उपोषण करीत आहे. यांची दखल घेतली नाही तर महिलांना सोबत घेऊन आमरण बेमुदत अन्नत्याग उपोषण धुळे जिल्ह्यात केले जाईल, असा इशारा निवेदनात दिला आहे.