आमदारांनी केली विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची सोय
धुळे : भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका असलेल्या वार्डात एमआयएम पक्षाच्या आमदारांच्या निधीतून विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका बांधण्याचे काम गुरूवारपासून सुरू झाले आहे. धुळे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी चार अभ्यासिका उभारण्याचा निर्णय आमदार फारुख शाह यांनी घेतला असून, यामुळे स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार आहे.
शहरातील विविध भागात सर्वांगीण विकास साधतानाच वेगवेगळ्या चार ठिकाणी अभ्यासिका सुरू करून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास साधण्याचा प्रयत्न आमदार फारुख शाह यांच्या माध्यमातून होतो आहे. ५ ऑक्टोंबर रोजी दूध डेअरी रोड परिसरात असलेल्या जिरेकर नगरमध्ये प्रवीण अग्रवाल यांच्या घराजवळ आ. फारुख शाह यांचे हस्ते २५ लाख रुपये खर्चाच्या अभ्यासिकेची भूमिपूजन झाले. यावेळी ही माहिती देण्यात आली.
धुळे शहरातील रस्ते, गटारी आणि मूलभूत सोयी-सुविधांसाठी आ. फारुख शाह हे प्रयत्न करीत आहेत. शहरातील विकासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी शहरात वेगवेगळ्या चार ठिकाणी अभ्यासिका सुरू करण्याचा मानस आ. शाह यांनी व्यक्त केला आहे. शहरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांना तोंड देण्यासाठी या अभ्यासिका महत्वपूर्ण भूमिका निभावणार आहेत. धुळे शहरात विटाभट्टी, देवपूर, साक्री रोड, कबीर गंज आणि जिरेकरनगर या भागात अभ्यासिका सुरू होऊ शकतील. नव्याने सुरू होणाऱ्या अभ्यासिकेसाठी प्रत्येकी २५ लाख रुपये खर्च अपेक्षित असून, या कामाच्या शुभारंभ आ. फारुख शाह यांच्या हस्ते झाला.
यावेळी लक्ष्मीबाई गायकवाड, चंद्रकला पाटील, कल्पना देवरे, संदीप जाधव, धडूकु पाटील, अमोल जिरेकर, डॉ. शराफत अली, प्यारेलाल पिंजारी, आसिफ शाह, अफसर शाह, इंजिनियर, रियाज शाह व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.