राज्यातील सर्व वायरमन का जमले होते धुळ्यात? काय आहेत त्यांच्या समस्या??
धुळे : महावितरणचा कणा समजला जाणारा लाईनस्टाफ अर्थात वायरमन यांच्या समस्या गंभीर आहेत. राज्यभरातील हजारो वायरमन रविवारी धुळे शहरात एकत्र आले आणि त्यांनी मुंबई-आग्रा महामार्गालगतच्या रिद्धी सिद्धी हॉलमध्ये राज्यस्तरीय मेळावा घेऊन आपल्या समस्या कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमुळे पोटतिडकीने मांडल्या.
काय झाले मेळाव्यात? : वायरमनवर पदोन्नती, वेतन श्रेणी, कामाचे तास, पेट्रोल भत्ता, अतिरिक्त काम अशा सर्वच बाबतीत गेली अनेक वर्ष अन्याय होत आहे. आमच्या समस्या सोडविता की नाही असा टोकाचा प्रश्न या कर्मचाऱ्यांनी संघटनांच्या पुढे मांडला. त्यामुळे लाईनस्टाफ कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीचा हा राज्यस्तरीय महामेळावा अत्यंत वादळी ठरला. कर्मचारी आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड वाद झाले. शेवटी लाईनस्टाफचे सर्व प्रश्न पूर्ण ताकदीनिशी शासनापुढे मांडण्याचा महत्त्वपूर्ण ठराव मेळाव्यात करण्यात आला. तसेच मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी सर्व संघटनांनी एकजुटीने लढा उभारण्याचा निर्णय घेतला. आमच्या मागण्या त्वरित मान्य केल्या नाहीत तर संपावर जाण्याचा इशारा राज्यातील वायरमानांनी दिला आहे.
हा खरोखरच अन्याय आहे : एमएसईबी महामंडळाचे विभाजन होऊन तीन कंपन्या अस्तित्वात आल्या. महापारेषण, महाजनरेशन आणि महावितरण अशा या तीन कंपन्या आहेत. तीनही कंपन्यांमध्ये लाईनस्टाफ म्हणजेच वायरमन भरताना पात्रता सारखीच आहे. महापारेषण आणि महाजनरेशन या दोन कंपन्यांमध्ये लाईनस्टाफ म्हणून नोकरी देताना वर्ग तीन पदावर नोकरी दिली जाते. परंतु महावितरण कंपनीचा कारभार मात्र उफराटा आहे. कारण वायरमनसाठी त्याच पात्रतेच्या उमेदवाराला या कंपनीत वर्ग चार पदावर नोकरी दिले जाते. त्यामुळे वेतनश्रेणी आणि भत्ते असे सर्व लाभ कमी मिळतात. महावितरणचा कणा असलेल्या या हजारो वायरमनवर हा खरोखरच अन्याय आहे. विशेष म्हणजे महावितरण कंपनी वगळता इतर दोन कंपन्यांमध्ये पहिल्याच दिवसापासून वर्ग तीन पदावर नियुक्ती दिली जाते. पण त्याच पात्रतेचा उमेदवार महावितरण कंपनीत मात्र वर्ग चार पदाचा कर्मचारी ठरतो आणि त्याला तब्बल पंधरा वर्षानंतर वर्ग तीन पदावर पदोन्नती मिळते.
पेट्रोल अलाऊन्सच्या बाबतीतही अन्यायच आहे कारण ऑफिसवर करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाच लिटर पेट्रोल दिले जाते आणि फिल्डवर काम करणाऱ्या लाईनस्टाफ कर्मचाऱ्यांना देखील तेवढाच पेट्रोल भत्ता दिला जातो. कायद्यानुसार कामाचे तास आठ असताना लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांना मात्र कामाच्या तासांचे बंधन नाही. त्यांना केव्हाही आणि कितीही तास कामावर बोलावले जाते. ह्या लाईन स्टाफ चे काम केवळ विद्युत पुरवठा सुरळीत ठेवणे आणि बिघाड झाल्यास दुरुस्त करणे एवढेच आहे. पण त्यांना पावसाळ्याच्या आधी झाडे तोडणे, वीज बिलांची वसुली करणे यासह इतर अतिरिक्त कामही दिली जातात.
राज्यस्तरीय कृती समितीची स्थापना : लाईनस्टाफ कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याच्या दृष्टीने लढा उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज लाईनस्टाफ बचाव कृती समितीची स्थापना या मेळाव्यात करण्यात आली. या समितीमध्ये कार्याध्यक्ष म्हणून वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेनेचे प्रवीण पाटील, बहुजन विद्युत अभियंता अधिकारी फोरमचे धर्मभूषण बागुल, महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे सय्यद जहिरोद्दिन, स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेचे एस. के. लोखंडे, स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियनचे पी. बी. उके, इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशनचे राजू अली मुल्ला, नवनिर्माण वीज कामगार सेनेचे श्रीकृष्ण खराटे, तांत्रिक कामगार युनियनचे प्रभाकर लहाने, क्रांतिकारी लाईनस्टाफ सेनेचे ललित शेवाळे, महाराष्ट्र राज्य लाईन स्टाफ प्रतिनिधी सुभाष बार्हे, आदिनाथ पवार, स्वप्निल सूर्यवंशी यांचा समावेश आहे. या समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऊर्जा मंत्रालयाचे प्रधान सचिव महावितरण कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक आणि इतरांचे संचालक यांना निवेदन दिले.
व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन : मुंबई स्थित हाॅंगकाॅंग बँक बिल्डिंगमध्ये कार्यालय असलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन देण्यात आले आहे. महावितरण कंपनीतील लाईनस्टाफने दिवसरात्र ऊन, वारा, पाऊस, निसर्गाचा प्रकोप, कोरोना महामारी अशा कोणत्याही परिस्थितीत शंभर टक्के कामावर हजर राहून सेवा दिली आहे. महावितरण ही देशातील सर्वात मोठी कंपनी असून, या कंपनीच्या अंतर्गत 457 शहरे, 41 हजार 95 गावे, दोन कोटी 81 लाख 34 हजार 876 ग्राहक आहेत. या सर्व ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी देखभाल दुरुस्तीसह इतर सर्व कामे लाईनस्टाफकडून करून घेतली जातात. त्यामुळेच व्यवस्थापकीय संचालक यांनी लाईनस्टाफला महावितरणचा कणा असे संबोधले आहे याच लाईनस्टारच्या हजारो जागा रिक्त असताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीत समर्थपणे तोंड देऊन कर्तव्य पार पाडत आहेत थकबाकी वसूल करून महावितरण ची आर्थिक स्थिती सुरळीत केली आहे.
या आहेत प्रमुख मागण्या :
1. महावितरण लाईनस्टाफ कर्मचारी यांची स्वतंत्र वेतनश्रेणी करून वर्ग चारमधून वर्ग तीनमध्ये वर्गीकरण करावे आणि तारमार्ग निरीक्षक व तारमार्ग बांधकाम कार्यदेशक ही पदे पूर्ववत चालू करावेत.
2. महावितरणमधील ग्रामीण व शहरी भागातील लाईनस्टाफ यांचे कामाचे स्वरूप व कामाचे तास निश्चित करावेत.
3. महावितरण लाईनस्टाफ कर्मचाऱ्यांना 2018-23 पगारवाढ कराराप्रमाणे नमूद केल्यानुसार वास्तविक प्रवासाच्या आधारावर एक जानेवारी 2020 पासून फरकासह वाढीव 20 लिटर पेट्रोल भत्ता द्यावा.
4. ग्राहकांची विद्युत देयकांची थकबाकी वसुली हे काम सांघिक स्वरूपाचे असल्याने किती रक्कमेची थकबाकी कोणी वसूल करायची याबाबत जबाबदारी निश्चित करावी.
5. विद्युत कर्मचाऱ्यांच्या वाढत्या अपघातांची संख्या पाहता अत्याधुनिक स्वरूपाची सुरक्षा साधने उपलब्ध करून द्यावी.
6. लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाव्यतिरिक्त जागा पदाचा भार स्वीकारण्यास सांगू नये अथवा अतिरिक्त कामाचे विशेष वेतन अदा करावे आणि अतिकालीन कामाचा मोबदला अदा करावा.
लाईनस्टाफ कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया
लाईनस्टाफ कर्मचाऱ्यांवर वेतनश्रेणी, भत्ते, कामाचे तास, कामाचे स्वरूप अशा अनेक बाबतीत अन्याय होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही आमच्या मागण्या लावून धरल्या आहेत. परंतु या प्रलंबित मागण्यांची दखल घेतली जात नाही. त्यामुळे आम्ही राज्यभरातील सर्व लाईनस्टाफ धुळे शहरात एकत्र येऊन मिळावा घेतला आहे. या मेळाव्याला आमच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित केले असून, त्यांच्यापुढे आमच्या मागण्या मांडल्या. – योगेश लांडगे, लाईनस्टाफ कर्मचारी, नंदुरबार