प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत धुळ्यात होणार आदिवासी हक्क परिषद
धुळे : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत धुळे शहरात 26 ऑक्टोबर रोजी आदिवासी हक्क परिषद होणार आहे, अशी माहिती वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष किसनराव चव्हाण यांनी गुरुवारी धुळ्यात पत्रकार परिषदेत दिली.
पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकरांच्या सभेच्या पूर्वतयारीसाठी गुरूवारी धुळ्यात आदिवासी कार्यकर्त्यांची बैठक झाली. बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. किसनराव चव्हाण म्हणाले, 2019 च्या निवडणूकीवेळी त्यांनी आजपर्यंत सत्तेच्या परिघाबाहेर राहीलेल्या विविध समाजघटकांना सोबत घेत, त्यांच्यामध्ये राजकीय आत्मभान निर्माण करुन वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. त्या राजकीय प्रयोगाने पहिल्याच प्रयत्नात लोकसभेच्या निवडणूकांमध्ये तब्बल 42 लाख मतांच्या आकडेवारीला मुसंडी मारत देशाच्या राजकीय वर्तूळात आपली एक नवी ओळख निर्माण केली होती. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे चांगलेच चर्चेत आले होते. वंचितने रितसर प्रस्तावही कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडे पाठवला ; तरी देखील इंडिया आघाडीकडून वंचित बहूजन आघाडीला ‘इंडिया आघाडीत’ सामावून घेण्याबाबत काहीही सकारात्मक उत्तर येत नसल्यामुळे वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी अलिकडे पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील लोकसभेच्या थेट स्वबळावर 48 जागा लढण्याची घोषणा केली. याची पूर्वतयारी म्हणून प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रातील काही महत्वाच्या ठिकाणी जाहिर सभा आणि धुळे शहरात ‘आदीवासी हक्क परिषद’ घेण्याचे जाहीर केले आहे.
26 ऑक्टोबर रोजी धुळ्यात होणाऱ्या आदिवासी हक्क परिषदेला प्रकाश आंबेडकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष किसनराव चव्हाण यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की, आदिवासी दिनानिमित्ताने शिरपूर तालुक्यामध्ये आदिवासी बांधवांनी रॅली काढली होती. यामध्ये काही समाजकंटकांनी त्या रॅलीवर दगडफेक करीत आदिवासी समाजावर हल्ला चढवला होता या घटनेमध्ये आदिवासी समाजाच्या तरुणांना जेलमध्ये डांबले गेले. शिरपूर तालुक्यामध्ये आदिवासी समाजाचा आमदार आहे, मात्र तो भाजपाच्या विचारांचा गुलाम असल्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये आम्हाला एल्गार पुकारायचा करायचा आहे. त्यामुळेच प्रकाश आंबेडकर हे धुळे शहरात आदिवासी हक्क परिषद घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.